आदित्य भवर, पुणे: कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज (1 नोव्हेंबर) चित्रपट‘मुळशी पॅटर्न’ची आठवण करून देणारी थरारक घटना घडली आहे. रिक्षाचालक असलेल्या गणेश काळे (वय अंदाजे 30 वर्ष) याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी सहा राऊंड फायर करत थेट कोयत्याने वार केले. या भयानक हल्ल्यात गणेश काळे जागीच ठार झाला.
ADVERTISEMENT
पुण्यात भर रस्त्यात नेमकं काय घडलं?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत गणेश काळे हा कुख्यात गुन्हेगार समीर काळे याचा भाऊ असून तो येवलेवाडीत वास्तव्यास होता. समीर काळे हा सध्या कारागृहात असून तो सोमा गायकवाड टोळीचा सदस्य असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश काळेवर हल्लेखोरांनी सलग सहा गोळ्या झाडल्या. त्यानंतर खात्री करण्यासाठी त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे ही वाचा>> Pune: आयुष कोमकरच्या शरीरात सापडल्या 9 गोळ्या, मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आजोबानेच नातवाला संपवलं? चक्रावून टाकणारी स्टोरी!
पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे की, गणेशचा भाऊ समीर काळे हा वनराज आंदेकर खून प्रकरणात सहभागी होता. त्यानेच त्या वेळी खुनासाठी लागणारी पिस्तुले मध्य प्रदेशातून आणली होती. त्या वेळी समीरसह आबा खोंड, आकाश म्हस्के आणि संगम वाघमारे या चौघांनी मिळून 9 पिस्तुले धुळे मार्गे मध्यप्रदेशातून आणल्याची माहिती तपासात समोर आली होती.
समीर काळे सध्या जेलमध्ये असून, त्याचा भाऊ गणेश याची हत्या नेमकी कुणी आणि कोणत्या कारणातून केली याचा तपास कोंढवा पोलिसांनी सुरू केला आहे. या खुनामागे आंदेकर टोळी आणि सोम्या गायकवाड गटातील वैर असल्याचा पोलिसांना प्राथमिक संशय आहे.
दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी मोठा फौजफाटा दाखल केला असून, क्राईम ब्रँच आणि डीसीपी झोन-५ यांच्या पथकांकडून तपास सुरू आहे.
आजोबाकडून नातवाचीच केलेली हत्या?
दरम्यान, साधारण महिन्याभरापूर्वीच वनराज आंदेकरच्या हत्येतील प्रमुख आरोपी असलेल्या गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची पुण्यातच गोळ्या झाडून अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती. याच हत्ये प्रकरणी बंडू आंदेकर याला अटक करण्यात आली आहे. आयुष कोमकर हा बंडू आंदेकरच्या मुलीचा मुलगा म्हणजेच त्याचा नातू होता.
हे ही वाचा>> Ayush Komkar Murder: पुण्यात दहशत माजवली, नातवाची हत्या.. आरोपी बंडू आंदेकरला गुडघ्यावर बसवलं, पाहा पोलिसांनी केलं तरी काय!
वनराज आंदेकर हत्या प्रकरण
पुण्यातील नाना पेठेतील डोके तालीम परिसरात 1 सप्टेंबर 2024 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास वनराज आंदेकर यांच्यावर 14 ते 15 हल्लेखोरांनी अत्यंत निर्घृण हल्ला केला होता. या हल्ल्यात गोळीबार आणि कोयत्याने वार करून आंदेकरांना संपवण्यात आलं होतं. प्राथमिक तपासात या खुनामागे कौटुंबिक वाद, संपत्तीवरील तंटे आणि टोळी युद्धाचा संबंध असल्याचे समोर आलेले. या प्रकरणात पोलिसांनी एकून २१ जणांना अटक केली होती.
या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधारांमध्ये सोमनाथ गायकवाड, वनराज यांची बहीण संजीवनी कोमकर, तिचा पती प्रकाश कोमकर, जयंत कोमकर आणि गणेश कोमकर यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, गणेश आणि जयंत कोमकर हे वनराज यांचे मेहुणे आहेत. पोलिसांनी या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे.
वनराज आंदेकर यांच्या खुनामागे कौटुंबिक वाद आणि संपत्तीचा तंटा हे देखील एक प्रमुख कारण आहे. नाना पेठेतील एक दुकान गणेश कोमकर यांना देण्यात आले होते, परंतु ते महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईत पाडण्यात आलेले. यामुळे कोमकर आणि आंदेकर यांच्यातील संबंध ताणले गेले. याशिवाय, वनराज यांनी एका भांडणात मध्यस्थी केल्याने कोमकर यांच्या मनात राग होता. या सर्व कारणांमुळे गणेश आणि जयंत कोमकर यांनी सोमनाथ गायकवाडच्या साथीने वनराज यांच्या खुनाचा कट रचला होता. ज्यानंतर वनराज आंदेकरांना एकटं गाठून त्यांची हत्या करण्यात आली होती.
ADVERTISEMENT











