पुणे : पुजाऱ्याच्या वेशात आला, पहिल्यांदा हात जोडले अन् नंतर..,पिंपरी चिंचवडमध्ये काय घडलं?

Pune Crime News : भगवान श्री आदेश्वर शंकेश्वर पार्श्वनाथ जैन मंदिरात पुजाऱ्याचा वेष परिधान करून आलेल्या एका भामट्याने सुमारे एक किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरून नेला. या चोरीला गेलेल्या मुकुटाची किंमत बाजारभावाप्रमाणे सुमारे अडीच लाख रुपये असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Pune Crime News

Pune Crime News

मुंबई तक

02 Mar 2026 (अपडेटेड: 02 Mar 2026, 01:57 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुणे : पुजाऱ्याच्या वेशात आला

point

पहिल्यांदा हात जोडले अन् नंतर..,पिंपरी चिंचवडमध्ये काय घडलं?

Pune Crime News : पुण्यातील चिंचवड परिसरात श्रद्धेच्या नावाखाली मंदिरालाच लक्ष्य केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील भगवान श्री आदेश्वर शंकेश्वर पार्श्वनाथ जैन मंदिरात पुजाऱ्याचा वेष परिधान करून आलेल्या एका भामट्याने सुमारे एक किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरून नेला. या चोरीला गेलेल्या मुकुटाची किंमत बाजारभावाप्रमाणे सुमारे अडीच लाख रुपये असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हे वाचलं का?

ही संपूर्ण चोरी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, आरोपीची चोरी करण्याची पद्धत अत्यंत चकित करणारी होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसते की, आरोपीने आधी पुजाऱ्याचा पेहराव करून गाभाऱ्यात प्रवेश केला. देवाचे दर्शन घेण्याचे नाटक करत त्याने अत्यंत चलाखीने मुकुटावर कापड टाकले आणि तो झाकून टाकला. काही वेळ बाहेर जाऊन पुन्हा संधी मिळताच त्याने तो मुकुट उचलला आणि तेथून पसार झाला. पुजारी बनून आल्यामुळे कोणालाही त्याच्यावर सुरुवातीला संशय आला नाही.

हेही वाचा : धाराशिव : काकाने पुतणीला गळा दाबून संपवलं, कोयत्याने तुकडे करुन मृतदेह चारीमध्ये पुरला, हत्येचं कारणही समोर

मंदिरातील मुकुट चोरीला गेल्याचे लक्षात येताच मंदिर प्रशासनाने तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-1 ने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषणावरून आरोपीची ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने सापळा रचून अवघ्या 48 तासांच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव नरेश अगरचंद जैन असून तो एक सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपी नरेश जैन याच्यावर यापूर्वीच विविध पोलीस ठाण्यांत 12 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने अशाच प्रकारे इतरही मंदिरांना लक्ष्य केले आहे का, याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी शहरातील सर्व प्रमुख मंदिरे आणि धार्मिक स्थळांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अवघ्या दोन दिवसांत चोरीचा छडा लावल्याबद्दल भाविकांनी आणि मंदिर ट्रस्टने पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

लग्न झाल्यानंतरही एक्स बॉयफ्रेंड त्रास द्यायचा, शेवटी तरुणीने घरी बोलवून केला खून, ओळख पटू नये म्हणून ॲसिड फेकलं
 

    follow whatsapp