Pune Crime News : पुण्याच्या मुंढवा परिसरात एका 29 वर्षीय महिलेचा गळा दाबून खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले असून, पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आफरीन पठाण (वय 29 वर्षे, रा. वडगाव शेरी) असं खून झालेल्या महिलेचं नाव असून ती ब्युटीशियन होती. गोरखनाथ शिंदे (वय 44, रा. चंदननगर, पुणे) याने तिचा गळा दाबून खून केलाय. विवाहबाह्य संबंध लपवण्यासाठी आफरीनने गोरखनाथकडे 1 लाख रुपयांची मागणी केली होती, अन्यथा घरी याबाबतची माहिती देईल, अशी धमकीही तिने दिली होती. याच वादातून हा खून झाल्याचं स्पष्ट झालंय.
ADVERTISEMENT
हेही वाचा : रुग्णालयात बाईकने एन्ट्री, 7.30 चा टायमर आणि आरोपीचा सीसीटीव्ही; पुण्यात बॉम्ब कोणी ठेवला?
अधिकची माहिती अशी की, आफरीन पठाण या महिलेचा 5 ते 6 मे 2026 दरम्यान अज्ञात कारणावरून गळा दाबून खून करण्यात आला होता आणि तिचा मृतदेह केशवनगर मुंढवा येथील कचरा डेपोजवळ टाकून देण्यात आला होता. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला होता. फॉरेन्सिक टीमने तपास करुन संशयिताचा शोध घेत असताना पोलिसांनी गोरखनाथ शिंदे याला ताब्यात घेतले आणि सखोल चौकशी केली असता त्याने या खुनाची कबुली दिली.
हेही वाचा : बीड : थरकाप उडवणारा व्हिडीओ, 4 वर्षीय चिमुरड्यावर भटके कुत्रे तुटून पडले
पैशांचा वाद आणि ब्लॅकमेलिंग ठरले हत्येचे कारण
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी गोरखनाथ शिंदे आणि मयत आफरीन पठाण यांची गेल्या एक वर्षापासून ओळख होती आणि त्यातून त्यांच्यात मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते. 2 मे 2026 रोजी आफरीनने गोरखनाथकडे 1 लाख रुपयांची मागणी केली होती. 5 मे 2026 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास दोघे खराडी बायपास येथे भेटले आणि तिथून गोरखनाथच्या मारुती स्वीफ्ट डिझायर कारमधून (क्रमांक MH 12 WX 6504) व्हीटीपी मांजरी खुर्द येथे गेले. त्या ठिकाणी त्यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून पुन्हा तीव्र वाद झाला. आरोपीने 50 हजार रुपये सोबत आणले होते, मात्र आफरीन 1 लाख रुपयांच्या मागणीवर ठाम होती आणि पैसे न दिल्यास त्यांच्यातील संबंध आरोपीच्या घरी सांगण्याची धमकी तिने दिली. या ब्लॅकमेलिंगच्या रागातून गोरखनाथने कारमध्येच आफरीनचा हाताने गळा आवळून खून केला.
पुरावा नष्ट करण्यासाठी कचरा डेपोजवळ टाकला मृतदेह
हत्या केल्यानंतर आरोपीने आफरीनचा मृतदेह आपल्या कारमधून केशवनगर मुंढवा येथील कचरा डेपोजवळ नेला आणि तिथे एका निर्जन ठिकाणी टाकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तांत्रिक तपास करुन पोलिसांनी आरोपीचा माग काढला आणि त्याला बेड्या ठोकल्या.
कचरा डेपोजवळ मृतदेह फेकून दिल्यानंतर आरोपीला वाटले होते की तो कायद्याच्या कचाट्यातून वाचेल, परंतु गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे अवघ्या काही दिवसांतच हा गुन्हा उघडकीस आला. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आरोपी गोरखनाथ शिंदे याच्यावर आता बी.एन.एस. कलम 103 (1) अन्वये पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
नागपूर: 'गुलाबजाम आणले असतील, तर मला दोन दे', गुलाबजामच्या मागणीवरून तरुणाने मित्राला चाकूने भोसकलं
ADVERTISEMENT











