चक्रीवादळ अर्णबचा इम्पॅक्ट, 'या' जिल्ह्यांना पाऊस झोडपणार!

मुंबई तक

29 Oct 2026 (अपडेटेड: 29 Oct 2026, 11:36 AM)

Cyclone arnab maharashtra weather alert : अर्णब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील विदर्भासह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जाणून घ्या, २९ आणि 30 ऑक्टोबर रोजी कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट आहे.

Cyclone arnab maharashtra weather alert

Cyclone arnab maharashtra weather alert

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

चक्रीवादळ अर्णबचा इम्पॅक्ट, 'या' जिल्ह्यांना पाऊस झोडपणार!

point

महाराष्ट्रातील विदर्भासह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा

Cyclone arnab maharashtra weather alert : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अर्णब चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये जाणवण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे पूर्व विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला असून, गडचिरोली जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांतही पावसाची शक्यता आहे. 28 ऑक्टोबर 2026 रोजी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले. त्यानंतर त्याची तीव्रता हळूहळू कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र, चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली तरी त्याच्याशी संबंधित आर्द्र हवा आणि कमी दाबाची स्थिती पुढे सरकू शकते. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

चक्रीवादळाच्या प्रभावाखालील भागांमध्ये पाऊस सुरु राहणार 

अर्णब चक्रीवादळाचा परिणाम सध्या आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जाणवत आहे. आंध्र प्रदेशात चक्रीवादळ धडकल्यानंतर ते ताशी सात किलोमीटर वेगाने वायव्य दिशेने सरकत असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील 48 तासांत त्याची तीव्रता टप्प्याटप्प्याने कमी होण्याची शक्यता आहे. तीव्र चक्रीवादळाचे रूपांतर चक्रीवादळात, त्यानंतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात आणि पुढे कमी दाबाच्या क्षेत्रात होऊ शकते. चक्रीवादळ जमिनीवर धडकल्यानंतर जमिनीशी होणाऱ्या घर्षणामुळे त्याची ताकद कमी होते. तसेच समुद्रातून मिळणारा उष्णता आणि आर्द्रतेचा पुरवठाही कमी होतो. मात्र, चक्रीवादळाशी संबंधित आर्द्र हवा पुढे सरकल्यामुळे त्याच्या प्रभावाखालील भागांमध्ये पाऊस सुरू राहू शकतो.

हेही वाचा : सतिश चव्हाणांचा गेम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं? इनसाईड स्टोरी..

चक्रीवादळाचा थेट तडाखा बसण्याऐवजी अप्रत्यक्ष परिणामांमुळे पाऊस होण्याची शक्यता

29 ऑक्टोबर रोजी ओडिशा, छत्तीसगड, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या राज्यांतील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आंध्र प्रदेशात चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अतिमुसळधार पावसाचा धोका निर्माण झाला होता. महाराष्ट्रात मात्र चक्रीवादळाचा थेट तडाखा बसण्याऐवजी त्याच्या अप्रत्यक्ष परिणामांमुळे पाऊस होण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये याचा परिणाम अधिक जाणवू शकतो. गडचिरोली जिल्ह्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यानंतरही पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज कायम आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणीही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

30 ऑक्टोबर रोजी बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, महाराष्ट्रातील विदर्भ आणि मध्य प्रदेश या भागांमध्ये पावसाचा इशारा कायम राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट देण्यात आल्याचे हवामान अहवालात सांगण्यात आले आहे. विदर्भातील इतर भागांमध्येही पावसाची शक्यता असल्याने पुढील दोन दिवस हवामानातील बदलांकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे. चक्रीवादळाची तीव्रता कमी होत असली तरी त्याच्याशी संबंधित आर्द्र हवा आणि कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा प्रभाव लगेच संपेलच असे नाही. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात पाऊस झाला आणि तुमच्या भागात सध्या हवामान कसे आहे, याची माहिती नागरिकांकडून जाणून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.