Kolhapur Crime News : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातल्या सातवे गावात चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलत्याच्या घरातून 15 तोळे सोन्याचे दागिने चोरून त्यातून मिळालेल्या पैशांत थार कार खरेदी केल्याचा आरोप 19 वर्षीय पुतण्यावर आहे. नवीन कारच्या पूजेसाठी त्याने चुलत्यालाच निमंत्रण दिलं. मात्र, पूजेच्या वेळी दागिने गायब असल्याचं लक्षात आल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.
ADVERTISEMENT
हेही वाचा : सुनेत्रा पवार राज्याच्या अर्थमंत्री होणार? राष्ट्रवादीची बैठक अन् फडणवीसांच्या भेटीगाठी; काय घडतंय?
चोरीच्या पैशातून समरने थार खरेदी केल्याचा संशय
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातल्या सातवे गावात ही घटना घडली आहे. समर पोपट चव्हाण असं 19 वर्षीय संशयित पुतण्याचं नाव आहे. त्याने साधारण महिनाभरापूर्वी चुलते उमेश मारुती चव्हाण यांच्या घरातून 15 तोळे सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप आहे. या दागिन्यांची गावातील सोनार संग्राम मोरे याला विक्री केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या व्यवहारातून मिळालेल्या 10 लाख रुपयांत समरने महिंद्रा कंपनीची थार कार खरेदी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नवीन कार घरी आल्यानंतर समरने तिच्या पूजेसाठी चुलते उमेश चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आमंत्रित केलं होतं.
हेही वाचा : बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली महिला अन् समोर बघते तर नवरा, दोघांचे पाय बांधून नवऱ्यानं...
तपासातून चोरीच्या प्रकरणात समरचा सहभाग असल्याचा संशय बळावला
कारच्या पूजेच्या वेळी घालण्यासाठी दागिने काढण्याचा प्रयत्न केला असता उमेश चव्हाण यांच्या घरातील दागिने गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. घरात ठेवलेले आजीचे दागिने मात्र जागेवरच होते. केवळ उमेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नीचे दागिने चोरीला गेल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्यांना घरातील किंवा जवळच्या व्यक्तीने चोरी केली असावी, असा संशय आला. त्यानंतर त्यांनी कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या अनुषंगाने तपास सुरू केला. समरने अचानक नवीन थार कार कशी खरेदी केली आणि त्यासाठी पैसे कुठून आणले, याची चौकशी करण्यात आली. या तपासातून चोरीच्या प्रकरणात समरचा सहभाग असल्याचा संशय बळावला.
या प्रकरणी कोडोली पोलिसांनी समर चव्हाण आणि चोरीचे दागिने खरेदी केल्याचा आरोप असलेल्या सोनार संग्राम मोरे या दोघांना ताब्यात घेतलं आहे. चोरीला गेलेले दागिने आणि इतर मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. चुलत्याच्या घरातून दागिने चोरीला गेल्याचा आरोप, त्यातून मिळालेल्या पैशांत थार कार खरेदी केल्याचा संशय आणि त्याच चुलत्याला कारच्या पूजेसाठी निमंत्रित करण्याचा घटनाक्रम यामुळे सातवे गावातील हे प्रकरण चर्चेत आलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT












