सुवर्णपदक विजेता नीरज यादवने संपवलं आयुष्य; अ‍ॅथलेटिक्सने का उचललं एवढं टोकाचं पाऊल?

मुंबई तक

• 12:40 PM • 28 Oct 2026

आशियाई पॅरा गेम्समध्ये तीन सुवर्णपदके जिंकणारा भारतीय पॅरा-ॲथलीट नीरज यादव यांचे वयाच्या 42 व्या वर्षी निधन झाले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, त्याने घरी विष प्राशन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

asian para games gold medalist neeraj yadav ends his life what led athlete take such an extreme step

सुवर्णपदक विजेता नीरज यादव (फाइल फोटो, सौ: गेट्टी)

Google CTA

नवी दिल्ली: आशियाई पॅरा गेम्समध्ये तीन सुवर्णपदके जिंकणारा अनुभवी भारतीय पॅरा-ॲथलीट नीरज यादव याचे वयाच्या 42 व्या वर्षी निधन झाले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, नीरजने घरी विष प्राशन केल्याचं समोर आलं आहे. बुधवारी (28 ऑक्टोबर) दिल्लीतील एका रुग्णालयात सध्या शवविच्छेदन केले जात आहे. दरम्यान, त्याच्या मृत्यूचे कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही.

हे वाचलं का?

भारतीय पॅरा ॲथलेटिक्स संघाचे मुख्य प्रशिक्षक एस. सत्यनारायण यांनी या घटनेला दुजोरा दिला. ते म्हणाले की, त्यांना या दुःखद घटनेची माहिती मिळाली, परंतु नीरजचा मृतदेह अद्याप रुग्णालयातच आहे. सत्यनारायण म्हणाले, "नीरजने आत्महत्या केली. ही घटना घडणे अत्यंत दुर्दैवी आहे." वृत्तानुसार, नीरज या महिन्यात आयची-नागोया येथे झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. डोपिंगमुळे मिळालेल्या बंदीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. यानंतर तो मानसिक तणावातून जात होता, असे वृत्त आहे. तथापि, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मुख्य प्रशिक्षक सत्यनारायण म्हणाले की, त्यांना नेमक्या कारणावर अंदाज व्यक्त करायचा नाही. ते म्हणाले की, एका खेळाडूने आयुष्यात यश आणि अपयश या दोन्हींचा सामना संतुलित मनाने केला पाहिजे. त्यांनी या घटनेला दुर्दैवी म्हटले आहे.

आशियाई पॅरा गेम्समध्ये तीन सुवर्णपदके जिंकली

नीरज यादव हा भारतातील सर्वात यशस्वी पॅरा-ॲथलीटपैकी एक होता. त्याने आशियाई पॅरा गेम्समध्ये एकूण तीन सुवर्णपदके जिंकली होती. त्याने जकार्ता येथे झालेल्या 2018 च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भालाफेकीत सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर त्याने हांगझू येथे झालेल्या 2023 च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भालाफेक आणि थाळीफेकमध्ये सुवर्णपदके जिंकली होती.

हे ही वाचा>> कोल्हापूर : चुलत्याच्या घरातून सोनं चोरलं, Thar गाडी घेतली; अन् पुजेलाही त्यालाच बोलावलं!

वयाच्या सातव्या वर्षी निदान

नीरजला वयाच्या सातव्या वर्षी पोलिओनंतरच्या अवशिष्ट पक्षाघाताचे निदान झालेले. त्याने सुरुवातीला व्हीलचेअर टेनिस खेळायला सुरुवात केली, पण नंतर तो पॅरा-ॲथलेटिक्सकडे वळला, जिथे त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली. नीरजने F55 प्रकारात स्पर्धा केली, ज्यामध्ये गोळाफेक, थाळीफेक आणि भालाफेक यांसारख्या बसून खेळल्या जाणाऱ्या मैदानी खेळांचा समावेश आहे.

टीप: जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला आत्महत्येचे विचार येत असतील, तर ही एक अत्यंत गंभीर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आहे. तात्काळ भारत सरकारच्या जीवनसाथी हेल्पलाइनला १८००२३३३३३० या क्रमांकावर संपर्क साधा. तुम्ही टेलीमानस हेल्पलाइनला १८००९१४४१६ या क्रमांकावर देखील कॉल करू शकता. तुमची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तज्ज्ञ तुम्हाला आवश्यक सल्ला देतील. लक्षात ठेवा, जीवनच सर्वस्व आहे.