Pune Crime - आदित्य भवार : पुण्यात हुंड्यासंबंधित आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. वडिलांनी लेकीच्या लग्नासाठी दोन कोटी रुपयांहून अधिक खर्च, हुंड्यात आलिशान फॉर्च्युनर कार, 55 तोळे सोने, चांदीची भांडी आणि घरगुती महागडी उपकरणे देऊनही सासरच्यांकडून पैशांची मागणी सुरुच राहिली. या लालसेपोटी एका 26 वर्षीय विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली. या प्रकरणात सासऱ्याने सुनेचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला, या प्रकरणात चार जणांविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
ही घटना मरकळ (ता. खेड) परिसरात घडली आहे. संबंधित प्रकरणात पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून पती आदित्य अनिल लोखंडे (वय 28), सासरे अनिल किसन लोखंडे (वय 53), सासू सुवर्णा अनिल लोखंडे (वय 48) आणि नणंद समृद्धी अनिल लोखंडे (वय 25) यांच्याविरोधात काही कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
तक्रारदार महिला आणि आदित्य लोखंडे यांचा विवाह 22 ऑगस्ट 2023 रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला होता. लग्नावेळी वधूच्या वडिलांनी लेकीला सासरी कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सढळ हाताने खर्च केला. सोन्याचे दागिने, चांदीची भांडी, महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह फॉर्च्युनर कार असा सुमारे दोन कोटी रुपयांचा ऐवज हुंड्यात देण्यात आला होता.
सोनं, नाणं, कडा आणि महागडे घड्याळ देऊनही आत्याचार सुरुच
मात्र, विवाहानंतरच काही महिन्यांमध्ये सासरच्या मंडळींचा खरा चेहरा समोर आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. पतीच्या वाढदिवसाचे कारण पुढे करत माहेरून पुन्हा सोनं आणि रोख रक्कम आणण्याचा तगादा लावूनच धरण्यात आला होता. तसेच वाढदिवसासाठी सोन्याचे कडे, महागडे घड्याळ आणि रोख रक्कम आणण्यास जबरदस्ती करण्यात आली. लेकीचा छळ थांबावा या अपेक्षेने वडिलांनी पुन्हा चार तोळ्यांचे सोन्याचे कडे तसेच 25 हजार रुपयांचे घड्याळ आणि 35 हजार रुपये रोख रक्कम दिली. तरीही पैशांची मागणी आणि छळ कमी झाला नाही, असा आरोप पीडितेने केल्याची माहिती समोर आली.
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे सासऱ्यानेच नातेसंबंधांना काळीमा फासणारे कृत्य केल्याचा आरोप. पीडित महिलेने आपल्या तक्रारीत सासऱ्याने विनयभंग केल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. सततच्या मानसिक तणाव, अपमान आणि छळाला कंटाळून अखेर तिने पोलिसांकडे धाव घेतली. विमानतळ पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपींची चौकशी सुरू आहे. पुढील तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT











