Pune Crime News : पुण्यात अक्षरश: कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे काढणारी एक अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. कात्रज चौक ते नवले ब्रिज या हायवेवरील राजमाता भुयारी मार्ग, दत्तनगर चौक येथे भरदिवसा एका रिक्षा चालकावर जुन्या भांडणाच्या रागातून धारदार हत्याराने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले आहे. ही घटना 18 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 10:15 वाजण्याच्या सुमारास घडली. सुरज माणिक काळे (वय 30 वर्षे, रा. कात्रज, पुणे) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने पावले उचलत या जीवघेण्या हल्ल्यात सामील असलेल्या तिन्ही आरोपी रिक्षा चालकांना ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : नशेचं इंजेक्शन देऊन सामुहिक बलात्कार, NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीसोबत भयंकर घडलं!
पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, जखमी सुरज काळे आणि आरोपींमध्ये दोन-तीन वर्षांपूर्वी पॅसेंजर (प्रवासी) भरण्याच्या कारणावरून मोठा वाद झाला होता. याच जुन्या वादाचा आणि भांडणाचा राग मनात धरून तिन्ही आरोपींनी दत्तनगर चौकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी सुरज याला गाठले आणि त्याच्यावर धारदार हत्याराने थेट हल्ला चढवला. या हल्ल्यात सुरज काळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या फिर्यादी सुरज यांची प्रकृती व्यवस्थित आणि स्थिर आहे.
हेही वाचा : नांदेड : मुलीसाठी पेपर विकत घेतला, CBI कडून 8 तास घराची झाडाझडती, 'तो' माणूस नेमका कोण?
आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तातडीने शोधमोहीम राबवून बापूराव ऊर्फ बापूसो बाळासाहेब भोसले (वय 35 वर्षे, रा. ता. वेल्हा, जिल्हा पुणे), गणेश हरिभाऊ धारपाले (वय 27 वर्षे, रा. ता. भोर, जिल्हा पुणे) आणि गणेश ऊर्फ भावड्या हरिभाऊ धरपाळे (वय 36वर्षे, रा. आंबेगाव पठार, पुणे) या तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर रोहित पवारांची टीका
पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात आणि महामार्गावर भरसकाळच्या वेळी घडलेल्या या कोयता हल्ल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर घटनेनंतर राजकीय वर्तुळातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून आमदार रोहित पवार यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर आणि पुण्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर कडक शब्दांत टीका केली आहे. आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधत म्हटले आहे की, "पुण्यात महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेवर भरदिवसा, गजबजलेल्या रस्त्यात कोयत्याने सपासप वार होतायेत, पण तरीही घाबरू नका! कारण महाराष्ट्र सरकार ‘सक्षम’ आणि ‘कार्यक्षम’ आहे!" त्यांच्या या उपरोधिक टीकेमुळे पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचा आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
आंबेगाव पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी
भरचौकात झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपींना अटक केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. आंबेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी सध्या या गुन्ह्यासंदर्भात अटक करण्यात आलेल्या बापूसो भोसले, गणेश धारपाले आणि गणेश ऊर्फ भावड्या धरपाळे या तिघांची कसून चौकशी करत आहेत. पॅसेंजर भरण्याच्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट खुनी हल्ल्यात कसे झाले आणि यामागे आणखी काही कारणे आहेत का, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. पोलीस या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवत असून न्यायालयाच्या प्रक्रियेसाठी आवश्यक ते कायदेशीर पुरावे गोळा करण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून वेगाने सुरू आहे.
ADVERTISEMENT











