Pune Crime News, पुणे : पतीसोबत झालेल्या वादानंतर पत्नी तिच्या मित्रासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. याचाच राग मनात धरुन पतीने तिचा चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्हाई परिसरात घडली आहे. दागिन्यांच्या वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून लोणीकंद पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. शैलेंद्र प्रकाश व्हटकर (वय 30, रा. बकोरी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून नम्रता शैलेंद्र व्हटकर ऊर्फ नम्रता चंद्रशेखर इंगळे (वय 19) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी शाहरुख दस्तगीर पठाण (वय 23, रा. बालाजी सोसायटी, शिरसवडी, वाडेबोल्हाई) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना 22 जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वाडेबोल्हाई येथील जोगेश्वरी हायस्कूलच्या मागील परिसरात घडली.
ADVERTISEMENT
वादाला कंटाळून दोन महिन्यांपूर्वी नम्रताने सोडलं होतं घर
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नम्रता व्हटकर आणि फिर्यादी शाहरुख पठाण हे गेल्या दोन महिन्यांपासून एकत्र राहत होते. सहा महिन्यांपूर्वी वेकफिल्ड कंपनीत काम करत असताना दोघांची ओळख झाली होती. नम्रताचा दोन वर्षांपूर्वी शैलेंद्र व्हटकर याच्याशी विवाह झाला होता. मात्र, नम्रता आणि पठाण यांच्यात प्रेमसंबंध असल्याची माहिती शैलेंद्रला मिळाल्यानंतर तो नम्रताशी वारंवार भांडणं करत होता. या सततच्या वादाला कंटाळून दोन महिन्यांपूर्वी नम्रताने पतीचे घर सोडून पठाण याच्याकडे राहण्यास सुरुवात केली होती. मात्र, तिचे सोन्याचे दागिने शैलेंद्रकडेच असल्याने ती वारंवार त्याच्याकडे दागिन्यांची मागणी करत होती.
नम्रताला चाकूने वार करुन संपवलं
फिर्यादी शाहरुख पठाण 22 जानेवारी रोजी कामानिमित्त शिरूर येथे गेला होता. रात्री सुमारे आठ वाजता तो घरी परतल्यानंतर नम्रताने शैलेंद्रला दागिन्यांसाठी फोन केल्याचे त्याला सांगितले. त्यानंतर शैलेंद्रने फोन करून नम्रताला प्रत्यक्ष भेटण्यास सांगितले आणि वाडेबोल्हाई मंदिराजवळ बोलावले. यानंतर नम्रता, शाहरुख पठाण आणि त्यांचा मित्र हरिष कोळपे हे तिघे वाडेबोल्हाई चौकात पोहोचले. शैलेंद्र जोगेश्वरी हायस्कूलच्या मागील बाजूस असल्याचे सांगितल्यानंतर नम्रता दुचाकीवरून त्याच्याकडे गेली. काही अंतरावर हरिष कोळपे निघून गेला, तर शाहरुख पठाण मंदिराजवळ थांबला होता. रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक नम्रताच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. धाव घेत पठाण घटनास्थळी पोहोचला असता शैलेंद्र चाकूने नम्रताच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर वार करत असल्याचे दिसून आले. पठाणने त्याला बाजूला ढकलत नम्रताला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी घटनास्थळी दुचाकी आणि चाकू टाकून फरार झाला. जखमी अवस्थेत नम्रताला तातडीने वाघोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेनंतर लोणीकंद पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत शैलेंद्र व्हटकर याला अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











