Gadchiroli Crime News, व्येकटेश दुडमवार : एका बाजूला जिल्हा होळीच्या रंगात न्हाऊन निघाला असताना, दुसऱ्या बाजूला कोरची तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या एका 8 वर्षीय निरागस अनाथ चिमुरडीवर तिच्याच नात्यातील 22 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : सोनं-चांदी, शेतजमीन ते कर्ज...; शिंदेंच्या शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या ज्योती वाघमारेंची संपत्ती किती?
होळीच्या दिवशी फूस लावून अत्याचार
पीडित मुलगी अनाथ असून तिचा सांभाळ तिचे मामा-मामी अत्यंत मायेने करतात. होळीच्या दिवशी सर्वत्र सणाचा उत्साह असताना, आरोपीने या चिमुरडीला फूस लावून आपल्या घरी नेले. रक्ताच्या नात्यातील या नराधमाने विश्वासघात करत तिच्यावर अत्याचार केला. 'कोणाला काही सांगितल्यास जीवंत सोडणार नाही,' अशी धमकी देऊन त्याने चिमुरडीला दहशतीखाली ठेवले होते.
अंघोळ घालताना मामीला धक्का
आरोपीच्या धमकीमुळे ही चिमुरडी पाच दिवस प्रचंड दहशतीखाली होती. मात्र, पाच दिवसांनंतर तिला आंघोळ घालताना मामीला तिच्या शरीरावरील जखमा आणि पोटावरील सूज दिसून आली. मामीने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, चिमुरडीने आपल्यावर ओढवलेला हा भीषण प्रसंग सांगितला. हे ऐकताच नातेवाईकांना मोठा धक्का बसला.
हे ही वाचा : मुख्याध्यापकाचा गावातील महिलांशी शरीरसंबंधांचा प्रयत्न, तरीही पोलिसांनी गावकऱ्यांनाच केली अटक; नेमकं काय घडलं?
आरोपीला पोलिस कोठडी
घटनेची माहिती मिळताच कोरची पोलिसांनी तत्काळ चक्र फिरवून नराधमाला बेड्या ठोकल्या. आरोपीवर पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत कठोर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 8 मार्च रोजी आरोपीला जेरबंद करण्यात आले. 9 मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अनाथ चिमुरडीवर झालेल्या या अन्यायामुळे आरोपीला कठोरतम शासन व्हावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.
ADVERTISEMENT











