पुणे : कचऱ्याचा डोंगर खाली सरकला, इमारत दबली गेली; 3 जणांचे पाय पिलरखाली

मुंबई तक

09 Jul 2026 (अपडेटेड: 09 Jul 2026, 02:04 PM)

pune news moshi building collapse : मोशी येथील कचऱ्याच्या डोंगराचा भाग घसरून इमारत कोसळल्यानंतर सुरू असलेले बचावकार्य 21 तासांनंतरही सुरू आहे. काही जणांशी संपर्क झाला असला तरी पिलरखाली अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यात अडचणी येत आहेत.

pune news moshi building collapse

pune news moshi building collapse

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पुणे : कचऱ्याचा डोंगर खाली सरकला

point

इमारत दबली गेली; 3 जणांचे पाय पिलरखाली

pune news moshi building collapse  : पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे कचऱ्याच्या डोंगराचा भाग घसरून दोन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याच्या घटनेनंतर बचावकार्याला 21 तासांहून अधिक काळ उलटला असून, अद्याप काही जण ढिगाऱ्याखाली अडकून आहेत. बचाव पथकांना अडकलेल्या काही लोकांशी संपर्क साधण्यात यश आले आहे. त्यांना चहा आणि बिस्कीटे दिले जात आहेत. मात्र त्यांच्या अंगावर इमारतीचे पिलर पडल्यामुळे त्यांना बाहेर काढणे अत्यंत कठीण ठरत आहे. अडकलेले लोक मदतीसाठी व्हिवळत असून, त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. काही लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असले तरी काहींशी अद्याप कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे बचावकार्य अधिक सावधगिरीने सुरू ठेवण्यात आले आहे.

हे वाचलं का?

कचऱ्याच्या डोंगराचा मोठा भाग दोन मजली इमारतीवर कोसळला

ही घटना मोशी येथील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कचरा डेपोच्या शेजारी घडली. दुपारी साधारण एक ते दीडच्या सुमारास कचऱ्याच्या डोंगराचा मोठा भाग घसरून शेजारील दोन मजली इमारतीवर कोसळला. त्यामुळे इमारत अर्धी कलंडली आणि तळमजल्यावरील कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले. या ठिकाणी एनडीआरएफ, एसडीआरएफ, स्थानिक अग्निशमन दल तसेच देहूरोड येथील लष्कराचे जवान संयुक्तपणे बचावकार्य करत आहेत. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला असून, आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा डोंगर घसरला? 

माहितीनुसार, मोशी येथील हा कचरा डेपो अनेक वर्षांपासून अस्तित्वात असून, त्याठिकाणी साचलेल्या कचऱ्याचा मोठा डोंगर तयार झाला आहे. त्याच्या शेजारी सुमारे अकरा महिन्यांपूर्वी वेस्ट टू एनर्जी प्रकल्पासाठी दोन मजली प्रशासकीय इमारत उभारण्यात आली होती. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा डोंगर घसरल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, काही समजण्याच्या आतच कचऱ्याचा मोठा भाग इमारतीवर सरकला आणि इमारत एका बाजूला कलंडली. वरच्या मजल्यावरील पाच जण तातडीने बाहेर पडण्यात यशस्वी झाले, मात्र तळमजल्यावरील कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले.

काहींना सुखरूप बाहेर काढण्यात यश

या दुर्घटनेत सुरुवातीला 22 ते 23 जण अडकल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी काहींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून, आणखी काही जण आत अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तीन जणांशी संपर्क साधण्यात यश आले असून, त्यांच्या पायावर पिलर पडल्यामुळे त्यांना हलता येत नाही. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक काम सुरू आहे. बचाव पथकांकडून त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवला जात असून त्यांना आवश्यक अन्नपदार्थही पुरवले जात आहेत. मात्र ज्या लोकांशी अद्याप संपर्क झालेला नाही, त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता कायम आहे. घटनास्थळी अडकलेल्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईकही मोठ्या संख्येने उपस्थित असून, बचावकार्य यशस्वी होण्याची ते प्रतीक्षा करत आहेत. बचाव पथकांकडून प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असून, संपूर्ण परिसरात खबरदारीचे वातावरण आहे.