रेल्वेचा डब्बा नव्हे हा तर हनिमून कोच.. Video समोर आला अन् टीसीचा बाजारच उठला!

मुंबई तक

• 08:00 AM • 09 Jul 2026

नांदिग्राम एक्स्प्रेसच्या फर्स्ट AC कोचमध्ये हनिमूनसाठी फुलांची सजावट केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यानंतर आता रेल्वेकडून अनधिकृत व्यक्तीला प्रवेश दिल्याप्रकरणी TTE निलंबित करण्यात आलं आहे.

honeymoon coach on indian railways video goes viral south central railway ticket checker suspended

व्हायरल व्हिडिओ (फोटो सौजन्य: Video Grab/Rajendra Aklekar)

Google CTA

मुंबई: भारतीय रेल्वेच्या फर्स्ट AC कोचमध्ये हनिमूनसाठी तयार करण्यात आलेल्या फुलांच्या आकर्षक सजावटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र, या व्हिडिओनंतर दक्षिण मध्य रेल्वेने (South Central Railway) तातडीने कारवाई करत संबंधित तिकीट तपासणीस (TTE) यांना निलंबित केले असून संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू केली आहे.

हे वाचलं का?

नेमकं प्रकरण काय?

दक्षिण मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 6 जुलै 2026 रोजी धावणाऱ्या ट्रेन क्रमांक 11002 नांदिग्राम एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका नवविवाहित जोडप्याने त्यांच्या फर्स्ट AC कोचची सजावट करण्यासाठी ऑनलाइन माध्यमातून खासगी डेकोरेटरची नियुक्ती केली होती.

हे ही वाचा>> Govt Jobs : बुलेट ट्रेन बनवणाऱ्या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, तब्बल 1 लाखाहून अधिक पगार

यानंतर संबंधित डेकोरेटरने रेल्वेच्या फर्स्ट AC कोचमध्ये प्रवेश करून संपूर्ण कोच फुलांनी सजवला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कोच गुलाबाच्या फुलांनी, हारांनी आणि सजावटीच्या साहित्याने आकर्षकपणे सजवण्यात आल्याचं दिसत आहे. अनेकांनी याला 'हनिमून कोच' अशी उपमा दिली. याचा व्हिडिओ राजेंद्र आकलेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

रेल्वेने घेतली गंभीर दखल

रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, डेकोरेटरचा कोचमध्ये प्रवेश अधिकृत नव्हता. रेल्वेच्या सुरक्षा नियमांनुसार, अधिकृत परवानगीशिवाय बाहेरील कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारे आरक्षित AC कोचमध्ये प्रवेश देता येत नाही.

हे ही वाचा>> इंडियन ऑईलमध्ये मोठी भरती, लगेच करा अर्ज

प्रवाशांची सुरक्षा, सामानाची सुरक्षितता आणि रेल्वेच्या सुरक्षा प्रोटोकॉलच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर मानण्यात आला आहे.

TTE निलंबित

या घटनेची माहिती समोर आल्यानंतर संबंधित तिकीट तपासणीस (Ticket Checker/TTE) यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

दक्षिण मध्य रेल्वेने स्पष्ट केलं आहे की, संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.  तसंच संपूर्ण प्रकरणाची सविस्तर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशी अहवालानुसार पुढील योग्य ती शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.

व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये फर्स्ट AC कोचचं रूपांतर एका हॉटेल रूमप्रमाणे करण्यात आल्याचं दिसत आहे. यामुळे अनेकांनी या सजावटीचं कौतुक केलं, तर दुसरीकडे रेल्वेच्या सुरक्षा नियमांचा भंग झाल्याबद्दल प्रश्नही उपस्थित करण्यात आले.

विशेषतः खासगी व्यक्ती रेल्वेच्या सुरक्षित परिसरात कशी पोहोचली आणि तिला प्रवेश कोणी दिला?, याबाबत सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली.

रेल्वेचे सुरक्षा नियम काय सांगतात?

भारतीय रेल्वेमध्ये आरक्षित डब्यांमध्ये केवळ वैध तिकीटधारक प्रवासी आणि अधिकृत रेल्वे कर्मचारी यांनाच प्रवेशाची परवानगी असते. कोणत्याही बाहेरील व्यक्तीला अधिकृत परवानगीशिवाय कोचमध्ये प्रवेश देणे हे सुरक्षा नियमांचे उल्लंघन मानले जाऊ शकते.

याच कारणामुळे दक्षिण मध्य रेल्वेने या घटनेकडे केवळ सजावटीचा विषय म्हणून न पाहता सुरक्षा त्रुटी म्हणून पाहिलं असून तातडीने शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे.