Amravati district women hospital nicu fire, धनंजय साबळे : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तिसऱ्या माळ्यावर असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला सोमवारी (दि.24) पहाटे अचानक आग लागली. या दुर्घटनेत तीन लहान बाळांचा मृत्यू झालाय. पहाटे साडेतीनच्या सुमारास व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागल्यानंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. नवजात शिशु कक्षात त्यावेळी 39 लहान बाळांना ठेवण्यात आले होते.
ADVERTISEMENT
हेही वाचा : छत्रपती संभाजीनगरात खवड्या टेकडी प्रकरणाला वळण, 2025 मध्ये मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न
कर्मचाऱ्यांकडून तातडीने बचावकार्य सुरू
आग लागल्याचे लक्षात येताच ड्युटीवर असलेल्या डॉक्टर, नर्स आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. आग आणि धूर पसरत असताना कर्मचाऱ्यांनी नवजात बालकांना कक्षातून बाहेर काढण्यास सुरुवात केली. अनेक बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
हेही वाचा : नागपूर : एकीवर दोघांचा जडला जीव, आरोपीच्या जामिनानंतर रक्तरंजित थरार
6 बालक उपचारासाठी रुग्णालयात दाखल
मात्र, या दुर्घटनेत तीन लहान बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच सहा बालकांना पुढील उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग लागल्यानंतर रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली होती. डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने बालकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.
नवजात शिशु अतिदक्षता कक्षातील व्हेंटिलेटरमध्ये स्फोट नेमका कशामुळे झाला आणि त्यानंतर आग कशी पसरली, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. या दुर्घटनेनंतर रुग्णालयातील नवजात बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या या घटनेची प्राथमिक माहिती समोर आली असून, आगीमागील नेमके कारण काय होते, हे तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT












