नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशननजीक एका इको व्हॅनमध्ये काही वेळापूर्वीच शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटानंतर संपूर्ण परिसरात एकच घबराट पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले असल्याचे समजते आहे. दरम्यान, या स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते या स्फोटाची तीव्रता प्रचंड होती. दरम्यान, या घटनेनंतर NIA चं पथक हे घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
दिल्लीत स्फोट, मुंबईत हायअलर्ट जारी!
दरम्यान, या भीषण स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीत हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दिल्लीतील स्फोटाची माहिती समोर येताच मुंबई पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणी गस्त वाढवली असून. ठिकठिकाणी तपासणी देखील सुरू केली आहे.
सध्या मुंबईत देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाकाबंदी करण्याचे देखील पोलिसांना आदेश देण्यात
आले आहेत. संशयास्पद व्यक्तींची तपासणी करण्याचे देखील आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. यासाठी ग्राउंड इंटेलिजेंस नेटवर्कचा वापर करण्यात आली आहे.तसंच संवेदनशील भागात गस्त वाढवण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
आज (10 नोव्हेंबर) संध्याकाळी 6.55 वाजता अग्निशमन दलाला स्फोटाची माहिती मिळाली. तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांचे पथक देखील तात्काळ घटनास्थळी रवाना झालं आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. स्फोटाचे स्वरूप निश्चित करण्यासाठी फॉरेन्सिक आणि तांत्रिक तज्ज्ञ देखील घटनास्थळी पोहोचले आहेत.
स्फोटानंतर, दिल्लीत हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सध्याच्या परिस्थितीवरून हा एक मोठा कट असू शकतो असे दिसून येते. दरम्यान, जवळील चांदणी चौक बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. तर लाल किल्ल्याभोवतीचा संपूर्ण परिसर आणि रस्ते बंद करण्यात आले आहेत.स्फोटानंतर एका कारने पेट घेतला आणि त्यात सात ते आठ इतर वाहने जळून खाक झाली. स्फोटाचे फोटो विदारक आहेत.
स्फोटानंतर जवळच उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फुटल्या. जेव्हा हा स्फोट झाला तेव्हा या परिसरात प्रचंड गर्दी होती. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारमध्ये नेमका कशामुळे स्फोट झाला याबाबतचे अधिकृत कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे सुरक्षा यंत्रणांना धक्का बसला आहे. सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की ही घटना केवळ स्थानिक स्फोट नाही. हा स्फोट अशावेळी झाला आहे की, आजच फरीदाबादमध्ये तब्बव 2900 किलो अमोनियम नायट्रेट सापडलं होतं त्यामुळे तपास यंत्रणांची चिंता वाढली आहे. अमोनियम नायट्रेट हे स्फोटके बनवण्यासाठी सामान्यतः वापरले जाणारं रसायन आहे. मात्र, आजच्या स्फोटाचा फरीदाबादच्या घटनेशी तात्काळ संबंध जोडणं हे घाईचं ठरू शकतं. मात्र, आता सगळ्या दृष्टीकोनातून पोलीस आणि तपास यंत्रणांना तपास करावा लागणार आहे.
ADVERTISEMENT











