Ahilyanagar Crime : पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे अध्यात्म आणि संस्काराचे धडे देणाऱ्या वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराज याने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील पाच वर्षांपासून धाक दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून पीडितेच्या तक्रारीनंतर पारनेर पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन अनेकदा अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी इयत्ता आठवीत असल्यापासून हा प्रकार सुरू होता आणि आरोपी यशवंत थोरात हा पीडितेच्या शेजारीच राहत असल्याने दोन्ही कुटुंबांचे घरोब्याचे संबंध होते. याचाच गैरफायदा घेऊन आरोपीने पीडितेवर वाईट नजर ठेवली होती आणि मुलगी घरी एकटी असताना त्याने वारंवार तिच्यावर बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले होते. पीडितेने या कृत्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला व तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन दहशत निर्माण केली होती.
बांबूने बेदम मारहाण , लोखंडी पक्कड गरम करुन दिले चटके
या घटनेचा थरार 10 मार्च 2026 रोजी शिगेला पोहोचला जेव्हा आरोपीने पीडितेला फोन करून स्वतःच्या घरी बोलावले आणि तिने येण्यास नकार दिला असता कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली. भीतीपोटी पीडिता तिथे गेली असता आरोपीने तिला कॉम्प्युटर रूममध्ये नेऊन बांबूने बेदम मारहाण केली आणि गॅसवर गरम केलेली लोखंडी पक्कड लावून तिला अमानुष चटके दिले. या अमानुष मारहाणीनंतरही त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला असून या छळामुळे पीडितेला चालणेही कठीण झाले होते.
गंभीर अवस्थेत असलेल्या पीडितेने 14 मार्च रोजी भावाकडे सर्व आपबिती कथन केल्यानंतर याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी यशवंत थोरात याला 15 मार्च रोजी पहाटे राहत्या घरातून अटक केली असून न्यायालयाने त्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून भोंदू महाराजावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











