Mumbai Air Pollution : मुंबईत सध्या बिघडलेली हवेची गुणवत्ता आणि वाढणारा उकाडा यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. 22 ऑक्टोबरच्या जागतिक हवेच्या गुणवत्ता निर्देशांक (AQI) रँकिंगनुसार, जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई थेट तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली होती. या दिवशी मुंबईचा AQI 176 नोंदवला गेला, ज्यामध्ये पाकिस्तानचे लाहोर पहिल्या तर दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर होते. विशेषतः हवेतील 'पीएम PM2.5' या सूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण धोक्याची पातळी ओलांडत असून, आकाराने अत्यंत लहान असलेले हे कण श्वासावाटे थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचत असल्याने मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाने वेळेआधीच पाठ फिरवल्यामुळे हवेत नैसर्गिकरीत्या होणारी धुलीकणांची स्वच्छता थांबली असून, कोरड्या हवामानामुळे समस्येत अधिकच भर पडली आहे.
ADVERTISEMENT
वाढत्या प्रदूषणामागे नेमकं कारण काय?
या वाढत्या प्रदूषणामागे केवळ पाऊस नसणे हेच एकमेव कारण नसून हवामानातील इतर घटक आणि एल निनोचा (El Nino) प्रभाव महत्त्वाचा मानला जात आहे. प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढण्याच्या या प्रक्रियेमुळे जगभरातील वाऱ्यांचा वेग आणि पावसाचे प्रमाण विस्कळीत झाले आहे. अमेरिकी हवामान संस्था 'नोआ'च्या (NOAA) अहवालानुसार, यंदा एल निनो तीव्र होत असून याचा प्रभाव 2026-27 च्या हिवाळ्यापर्यंत राहण्याची शक्यता आहे. वातावरण वैज्ञानिक गुफ्रान बेग यांच्या मते, मुंबईतील वाऱ्यांचा वेग मंदावणे तसेच हवा उष्ण व दमट राहिल्याने वातावरणातील अभिसरण (Air Circulation) कमी झाले आहे. परिणामी वाहनांचा धूर, बांधकामांची धूळ आणि स्थानिक प्रदूषक हवेत दूर पसरण्याऐवजी जमिनीलगत साचून राहत आहेत.
हे ही वाचा : Personal Finance: IPO येण्याआधी कंपनीचे शेअर्स विकत घेणं किती बरोबर?
हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो?
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) विस्तारित श्रेणीच्या अंदाजानुसार, ऑक्टोबरच्या उर्वरित दिवसांत महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत सर्वदूर पावसाची शक्यता फारच कमी आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे (North East Monsoon) मध्य, पूर्व आणि दक्षिण भारतात पावसासाठी काही प्रमाणात अनुकूल वातावरण तयार होऊ शकते, परंतु महाराष्ट्रात मोठा पाऊस पडण्याचे संकेत मिळालेले नाहीत. त्यामुळे आगामी काळात हवामानातील कोरडेपणा आणि धुळीचे साम्राज्य कायम राहण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
हे ही वाचा : Weather Update: उकाड्याचा तडाखा! पाहा हवामान खात्याने नेमका कोकण विभागाला कोणता दिलाय इशारा
उष्णता आणि प्रदूषणाचा दुहेरी सामना
सद्यस्थितीचा विचार करता कोकण आणि किनारपट्टीच्या भागात उष्णतेचा इशारा कायम आहे. हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी केला आहे, तर कोल्हापूरच्या घाट क्षेत्रात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांची (Thunderstorm) शक्यता वर्तवली आहे. आगामी दिवसांत तापमानात विशेष घट होण्याचे संकेत नसून, नागरिकांना उष्णता आणि प्रदूषणाचा दुहेरी सामना करावा लागणार आहे.
ADVERTISEMENT












