Mumbai News : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. लोकलमध्ये प्रवासादरम्यान मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणे किंवा व्हिडिओ पाहणे आता भलतेच महाग पडणार आहे. इतर प्रवाशांना होणारा त्रास रोखण्यासाठी मध्य रेल्वे (CR) आणि पश्चिम रेल्वे (WR) प्रशासनाने अशा लोकांवर कडक दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाईलचा आवाज मोठा ठेवून सहप्रवाशांची शांतता भंग करणाऱ्यांवर आता 1000 रुपये ते 5000 रुपयांपर्यंतचा दंड किंवा सहा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
ADVERTISEMENT
भारतीय रेल्वे कायद्यानुसार होणार कारवाई
ही संपूर्ण दंडात्मक कारवाई भारतीय रेल्वे कायद्याच्या 'कलम 145' (उपद्रव किंवा Nuisance निर्माण करणे) अंतर्गत केली जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना इयरफोनशिवाय मोठ्या आवाजात व्हिडिओ किंवा गाणी पाहणाऱ्या प्रवाशांवर तातडीने लक्ष ठेवण्याचे व कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ही मोहीम सुरुवातीला मुंबईतील लोकलमध्ये आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये लागू केली जाईल.
हे ही वाचा : उपोषणाला बसतो अन् बाथरुममध्ये खातो; कदमांच्या जहरी टीकेनंतर जरांगे भडकले; म्हणाले, “थोरली बेगम”
आधी ताकीद, नंतर दंड
कारवाईच्या स्वरूपाविषयी माहिती देताना रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, एखादा प्रवासी मोबाईलचा आवाज मोठा ठेवून त्रास देत असल्यास इतर प्रवासी थेट तिकीट तपासनिसाकडे (TC) तक्रार करू शकतात. सुरुवातीला संबंधित प्रवाशाला केवळ ताकीद देऊन मोबाईलचा आवाज बंद करण्यास किंवा इयरफोन वापरण्यास सांगितले जाईल. मात्र, ताकीद देऊनही प्रवाशाने नियम मोडणे सुरूच ठेवल्यास त्याच्याकडून कडक दंड वसूल केला जाईल.
हे ही वाचा : आरोपीची गर्लफ्रेंड राधा अन् तिच्यासोबत बबिता... टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी नवी खळबळजनक माहिती
उद्घोषणा होणार
सार्वजनिक वाहतूक ही सर्वांच्या सोयीसाठी आणि आदरासाठी असलेली एक जागा आहे, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. या नवीन नियमांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी रेल्वे स्थानकांवर तसेच ट्रेनच्या डब्यांमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये सातत्याने उद्घोषण (Public Announcements) केल्या जाणार आहेत.
ADVERTISEMENT












