Akola Crime News : अकोला शहराला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन तरुण तीन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. मात्र, प्रेमात धोका दिल्याने एकाने दुसऱ्याचा खून केल्याचं समोर आलंय. या प्रकरणामुळे केवळ अकोलाच नव्हे, तर संपूर्ण समाजात गंभीर चर्चा सुरू झाली असून नातेसंबंधांतील गुंतागुंत आणि मानसिक तणावाचे भयावह परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत. ही घटना अकोला शहरातील मोठी उमरी परिसरातील संजय नगर भागात घडली आहे.
ADVERTISEMENT
अधिकची माहिती अशी की, अमोल दिगंबर पवार आणि नितेश अरुण जंजाळ हे दोघे गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहत होते. सुरुवातीला त्यांचे नाते सुरळीत होते. मात्र, काही दिवसांपासून दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले होते. नितेशला अमोलचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून दोघांमध्ये सतत भांडणे होत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. बुधवारी रात्रीदेखील याच विषयावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
हेही वाचा : 'शहरातील गुन्हेगारी संपली पाहिजे म्हणता अन् तुमची यादी पाहिली तर...', मुरलीधर मोहोळांचा अजितदादांवर हल्लाबोल
मिळालेल्या माहितीनुसार, नितेश बाहेरून जेवण घेऊन आला होता. त्यानंतर पुन्हा जुन्या संशयावरून शाब्दिक वादाला सुरुवात झाली. हा वाद इतका टोकाला गेला की रागाच्या भरात नितेशने अमोलवर लाठी-काठीने हल्ला केला. अमोलच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जोरदार वार करण्यात आले. गंभीर जखमा झाल्याने अमोलचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर गुरुवारी सकाळी नितेश घराबाहेर धावत येत जोरजोरात आरडाओरड करू लागला. “अमोल पडला आहे, तो मेलाय,” असे सांगत त्याने परिसरात गोंधळ घातला. त्याच्या किंकाळ्या ऐकून शेजारी आणि परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. तात्काळ सिव्हिल लाईन पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.
पोलिसांना अमोलच्या शरीरावर गंभीर जखमा आणि मारहाणीच्या स्पष्ट खुणा आढळून आल्या. त्यामुळे मृत्यू संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले. नितेशची सखोल चौकशी करण्यात आली असता, अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. प्राथमिक तपासात डोक्यावर व चेहऱ्यावर झालेल्या गंभीर मारामुळेच अमोलचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, अंतिम अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणी नितेश जंजाळ याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. ही हत्या केवळ क्षणिक रागातून झाली की त्यामागे आणखी काही कारणे आहेत, याचाही शोध घेतला जात आहे. अकोल्यातील ही घटना समाजासाठी एक गंभीर इशारा मानली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











