Maharashtra Crime News, जका खान : जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. तरुणीच्या सोबतकॉफी पिताना दिसल्याने जमावाने तरुणाला सातत्याने बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत 20 वर्षीय सुलेमान खानचा ऑगस्ट महिन्यात मृत्यू झाला होता. मात्र, या प्रकरणातील काही आरोपींना 3 महिन्यांत जामीन मंजूर झाला. त्यामुळे सुलेमानच्या आई-वडिलांनी भीतीने गाव सोडण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे या कुटुंबाच्या अनेक पिढ्या बेटावद या गावात राहात होत्या. मात्र, जीवाच्या भीतीने कुटुंबियांवर गाव सोडण्याची वेळ आलीये.
ADVERTISEMENT
मुलीसोबत दिसल्याने सुलेमानची जमावाकडून हत्या, कुटुंबावर गाव सोडण्याची वेळ
अधिकची माहिती अशी की, ऑगस्ट महिन्याच्या 11 तारखेला जामनेर शहरातील ‘द ब्रँड’ नावाच्या चहा कॅफेमध्ये सुलेमान खान हा आपल्या ओळखीच्या तरुणीसोबत बसला होता. याचवेळी 8 ते 10 तरुणांचा एक जमाव तेथे आला आणि कोणताही वाद न घालता सुलेमानवर तुटून पडला. कॅफेमध्येच त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतरही मारहाण थांबली नाही. जखमी अवस्थेतील सुलेमानला दुचाकीवर बसवून दुसऱ्या गावात नेण्यात आलं आणि तिथेही त्याला मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर आरोपींनी सुलेमानला थेट त्याच्या बेटावद गावात आणून त्याच्या आई-वडिलांसमोर पुन्हा बेदम मारलं. या अमानुष मारहाणीत सुलेमान गंभीर जखमी झाला. नातेवाइकांनी त्याला जामनेर येथील रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
सुलेमानचे वडील रहीम खान यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेच्या रात्रीच चार आरोपींना अटक करण्यात आली, तर काही दिवसांनी आणखी सहा जणांना अटक करण्यात आली. अद्याप एक आरोपी फरार असून तो संबंधित चहा कॅफेच्या मालकाचा लहान भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. अलीकडेच या प्रकरणातील चार आरोपींना जामीन मंजूर झाला. विशेष म्हणजे हे आरोपी सुलेमानच्या गावातीलच असल्याचं समोर आलं आहे. आरोपींना जामीन मिळाल्याची माहिती कळताच सुलेमानच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला. काही वेळा आरोपी समोर दिसल्याने सुलेमानच्या वडिलांना मुलाच्या मारहाणीचे भयावह दृश्य पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येऊ लागले. जीवाला धोका असल्याची भीती सतावत असल्याने त्यांनी नोव्हेंबर महिन्यात कोणालाही न सांगता आपलं बेटावद गाव सोडून बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे येथे आश्रय घेतला.
सुलेमानचे आई-वडील काय म्हणाले?
मृत मुलाचे वडील रहीम खान म्हणाले, “माझ्या मुलाला त्याच्याच ओळखीच्या लोकांनी फिल्मी पद्धतीने घेरून मारलं. गावात असूनही कोणी त्याला वाचवलं नाही. आरोपींना पाहिलं की भीती वाटते. गावकऱ्यांवरच विश्वास उरलेला नाही.” त्यांनी सरकारकडे न्यायाची मागणी करत, “माझा सुलेमान गेला, पण आता कुणाचाही सुलेमान जाऊ नये,” अशी भावना व्यक्त केली.
सुलेमानची आई तबस्सुम यांचे अश्रू थांबत नाहीत. “माझ्या एकुलत्या एक मुलाला जनावरांपेक्षा वाईट वागणूक देत मारण्यात आलं. त्या गावात परत जाण्याची हिंमत नाही,” असं त्या म्हणाल्या. दरम्यान, सुलेमानचे मेहुणे महबूब खान यांनी आरोपींना मिळालेल्या जामिनाविरोधात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. आज सुलेमानचे आई-वडील बेटावद गावातील चार खोल्यांचं स्वतःचं घर सोडून, दुसऱ्या गावात अवघ्या 8×8 च्या भाड्याच्या खोलीत भीतीच्या सावटाखाली आयुष्य जगत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











