सांगली : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सांगलीतील कॉलेज कॉर्नर परिसर रक्तरंजित घटनेने हादरला. एन. एस. लॉ कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ पूर्वीच्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून विष्णू सतीश वडर (वय २३, रा. वडर कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे. हल्ल्यानंतर अवघ्या दोन तासांत विश्रामबाग पोलिसांनी कारवाई करत आर्यन हेमंत पाटील (वय 23) आणि आदित्य प्रमोद वालकर (वय 21) या दोघांना ताब्यात घेतले. जुन्या खुनी हल्ल्याचा राग मनात ठेवूनच हा खून केल्याची बाब तपासात पुढे आली आहे.
ADVERTISEMENT
किरकोळ कारणातून निर्घुण खून
अधिकची माहिती अशी की, मृत विष्णू हा किरकोळ मजुरीची कामे करून उदरनिर्वाह करत होता. मात्र तो अनेकदा कॉलेज कॉर्नर परिसरात टवाळकी करणाऱ्या तरुणांच्या संगतीत दिसून येत असे. किरकोळ कारणावरून झालेला वादच अखेर त्याच्या जिवावर बेतल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत मतदानापूर्वीच महायुतीनं उधळला विजयी गुलाल, भाजपसह शिवसेनेचे 'एवढे' उमेदवार बिनविरोध विजयी
रागाने काय बघतोय? म्हणत झाला होता वाद
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी आर्यन पाटील हा दीड वर्षांपूर्वी छायाचित्रकार म्हणून काम करत होता आणि कॉलेज कॉर्नर परिसरात त्याचा नेहमी वावर असायचा. याच काळात विष्णू वडर आणि आर्यन यांच्यात केवळ “रागाने पाहिलं” या कारणावरून वाद झाला होता. या वादाचे पर्यवसान 1 जुलै 2024 रोजी एन. एस. लॉ कॉलेजच्या गेटसमोरील चौकात गंभीर हल्ल्यात झाले होते. त्या घटनेत आर्यन पाटील याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी विष्णू वडर, पृथ्वीराज कलकुटगी आणि मंथन नावाच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
या घटनेनंतर काही काळ तणाव शांत झाला होता. मात्र काही महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा दोन्ही गटांत वाद झाला. या जुन्या हल्ल्याची खदखद आणि अलीकडील वादाचा राग आर्यन पाटीलच्या मनात कायम होता. त्यामुळेच बदला घेण्याच्या उद्देशाने तो संधीच्या शोधात होता. गुरुवारी दुपारी साधारण दोनच्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर परिसरात मोठी वर्दळ होती. काही वेळ आधीच विश्रामबाग पोलिसांचा गस्त कर्मचारी परिसरातून निघून गेला होता. त्याच दरम्यान आर्यन पाटील आणि त्याचा साथीदार आदित्य वालकर यांनी विष्णू वडरला गाठून जुना वाद उकरून काढला. शाब्दिक वादाचे रूपांतर क्षणात हिंसाचारात झाले. आर्यनने धारदार शस्त्र काढून विष्णूवर सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत विष्णूला नागरिकांनी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली आणि काही तासांतच आरोपींना ताब्यात घेतले. या खुनामुळे कॉलेज कॉर्नर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अशा घटनांवर आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











