Nanded Crime: नांदेडमध्ये सूडाच्या भावनेतून एक भयंकर घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. विनयभंगाच्या प्रकरणात जामिनावर सुटलेल्या आरोपीने त्यांच्या कुटुंबियांसोबत मिळून पीडितेच्या पतीला जाळून टाकल्याचं वृत्त आहे. संबंधित घटना ही नांदेडमधील नायगाव तहसीलच्या बेंद्री गावातील असल्याची माहिती समोर आली आहे. 29 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास आरोपीने पीडितेच्या पतीसोबत हे भयंकर कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. या हल्ल्यात पीडित तरुण गंभीररित्या जखमी झाला असून पोलिसांनी या प्रकरणातील तीन आरोपींना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
विनयभंगाच्या आरोपाखाली तुरुंगात रवानगी
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित महिलेने त्याच गावातील संतोष माधवराव बेंद्रीकर याच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार पोलिसात दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे, 22 डिसेंबर रोजी नायगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर, आरोपी जवळपास एक आठवडा फरार होता. अखेर, पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि 28 डिसेंबर रोजी नरसी परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. खरं तर, काही तासांतच आरोपीला जामीन मंजूर झाला आणि तो तुरुंगातून बाहेर आला.
महिलेच्या पतीला टार्गेट केलं
त्यानंतर, तो परत त्याचा गावी परतला. त्यावेळी त्याच्या मनात पीडितेच्या सूडाची भावना होती आणि यातूनच त्याने त्याचे वडील माधव आणि भाऊ शिवकुमार यांच्यासोबत मिळून एक प्लॅन बनवला. या योजनेत त्यांनी पीडित महिलेच्या पतीला टार्गेट करण्याचं ठरवलं आणि 29 डिसेंबर रोजी सकाळी जवळपास 5.30 वाजताच्या सुमारास त्यांनी महिलेच्या घरात घुसून तिच्या पतीला घेरलं. त्यावेळी, दोन्ही पक्षात मोठा वाद झाला.
हे ही वाचा: सांगली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी NS लॉ कॉलेज समोर रक्ताचा सडा, किरकोळ वादातून तरुणाचा निर्घुण खून
पीडितेच्या पतीवर पेट्रोल टाकून जाळलं...
मिळालेल्या माहितीनुसार, याच वादातून आरोपींनी महिलेच्या पतीवर पेट्रोल टाकून आग लावली. आरडाओरडा ऐकून गावकरी घटनास्थळी पोहोचले आणि या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या, संबंधित तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर, तातडीने पोलिसांना याची माहिती देण्यात आली आणि पोलिसांनी त्वरीत कारवा करत आरोपी संतोष बेंद्रीकरसह त्याच्या वडील आणि भावाला अटक केली.
हे ही वाचा: मुंबई : नववर्षाच्या निमित्ताने मिठाई देण्यासाठी घरी बोलावलं, अन् प्रेयसीने प्रियकराचं गुप्तांग कापलं
30 डिसेंबर रोजी तिघांना कोर्टात सादर करण्यात आलं आणि तिथून त्यांना चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या भयंकर घटनेनंतर, बेंद्री गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पनेगावकर यांनी गावाची पाहणी केली आणि गावकऱ्यांशी संवाद साधला. आता, तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT











