सांगली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी NS लॉ कॉलेज समोर रक्ताचा सडा, किरकोळ वादातून तरुणाचा निर्घुण खून
Sangli Crime News : अधिकची माहिती अशी की, मृत विष्णू हा किरकोळ मजुरीची कामे करून उदरनिर्वाह करत होता. मात्र तो अनेकदा कॉलेज कॉर्नर परिसरात टवाळकी करणाऱ्या तरुणांच्या संगतीत दिसून येत असे. किरकोळ कारणावरून झालेला वादच अखेर त्याच्या जिवावर बेतल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सांगली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एन.एस लॉ कॉलेज समोर रक्ताचा सडा
किरकोळ वादातून तरुणाचा निर्घुण खून
सांगली : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सांगलीतील कॉलेज कॉर्नर परिसर रक्तरंजित घटनेने हादरला. एन. एस. लॉ कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ पूर्वीच्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून विष्णू सतीश वडर (वय २३, रा. वडर कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे. हल्ल्यानंतर अवघ्या दोन तासांत विश्रामबाग पोलिसांनी कारवाई करत आर्यन हेमंत पाटील (वय 23) आणि आदित्य प्रमोद वालकर (वय 21) या दोघांना ताब्यात घेतले. जुन्या खुनी हल्ल्याचा राग मनात ठेवूनच हा खून केल्याची बाब तपासात पुढे आली आहे.
किरकोळ कारणातून निर्घुण खून
अधिकची माहिती अशी की, मृत विष्णू हा किरकोळ मजुरीची कामे करून उदरनिर्वाह करत होता. मात्र तो अनेकदा कॉलेज कॉर्नर परिसरात टवाळकी करणाऱ्या तरुणांच्या संगतीत दिसून येत असे. किरकोळ कारणावरून झालेला वादच अखेर त्याच्या जिवावर बेतल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत मतदानापूर्वीच महायुतीनं उधळला विजयी गुलाल, भाजपसह शिवसेनेचे 'एवढे' उमेदवार बिनविरोध विजयी
रागाने काय बघतोय? म्हणत झाला होता वाद
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी आर्यन पाटील हा दीड वर्षांपूर्वी छायाचित्रकार म्हणून काम करत होता आणि कॉलेज कॉर्नर परिसरात त्याचा नेहमी वावर असायचा. याच काळात विष्णू वडर आणि आर्यन यांच्यात केवळ “रागाने पाहिलं” या कारणावरून वाद झाला होता. या वादाचे पर्यवसान 1 जुलै 2024 रोजी एन. एस. लॉ कॉलेजच्या गेटसमोरील चौकात गंभीर हल्ल्यात झाले होते. त्या घटनेत आर्यन पाटील याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी विष्णू वडर, पृथ्वीराज कलकुटगी आणि मंथन नावाच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.










