बीड : मद्यधुंद तरुणांच्या स्कॉर्पिओची पोलीस जीपला जोरदार धडक; वाहन शेतात कोसळले, 5 कर्मचारी जखमी
Beed Accident : अपघाताची माहिती मिळताच नेकनूर आणि पाटोदा पोलीस प्रशासनाने रात्रीच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरलेल्या तरुणांवर कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बीड : मद्यधुंद तरुणांच्या स्कॉर्पिओची पोलीस जीपला जोरदार धडक;
वाहन शेतात कोसळले, 5 कर्मचारी जखमी
Beed Accident , रोहिदास हातागळे/बीड : अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर मद्यधुंद तरुणांनी चालवलेल्या एका भरधाव स्कॉर्पिओने पोलीस जीपला पाठीमागून भीषण धडक दिली. या अपघातात पोलिसांचे वाहन थेट रस्त्याशेजारील शेतात कोसळले असून, जामखेड पोलीस ठाण्यातील 5 कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना रात्री 11:30 च्या सुमारास बीड तालुक्यातील लिंबागणेश जवळील पवार वस्ती येथे घडली.
जामखेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी बीड येथील कारागृहात एका आरोपीला सोडून आपल्या सरकारी जीपने (क्र. MH 16 DG 6081) परतत होते. लिंबागणेश फाट्याजवळ आले असताना, पाठीमागून येणाऱ्या भायाळा येथील एका स्कॉर्पिओने (क्र. MH 20 BN 1565) पोलीस जीपला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, चालकाचे नियंत्रण सुटले आणि पोलीस वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात गेले.
हेही वाचा : पत्नीच्या WhatsApp स्टेटसवर तरुणाची अश्लील कमेंट; संतापलेला पती जाब विचारायला गेला, पण त्याचीच झाली हत्या
प्रत्यक्षदर्शी आणि जखमी पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धडक देणाऱ्या स्कॉर्पिओमध्ये 4 ते 5 तरुण होते आणि ते सर्व मद्यधुंद अवस्थेत होते. या तरुणांच्या बेजबाबदारपणामुळे कर्तव्य बजावून परतणाऱ्या पोलिसांच्या जिवावर बेतले होते. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक भाऊराव शिंदे आणि विक्रांत वाणी यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या पाचही पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ जामखेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.










