वरुड/पुसला : लग्न लागल्यानंतर कोणत्याही दाम्पत्याच्या आयुष्यात सुखी संसाराची स्वप्ने रंगू लागतात. वधू–वरांसह वन्हाडी, नातेवाइक यांच्यात आनंद आणि समाधानाचे वातावरण असते. मात्र, अमरावतीत घडलेल्या एका घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मंगलाष्टकांच्या गजरात, सनई–चौघड्यांच्या सुरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत पार पडलेला विवाह सोहळा अवघ्या काही तासांत दुर्दैवी वळणावर आला. वरुड तालुक्यातील पुसला येथे मंगळवारी दुपारी विवाह झाल्यानंतर अवघ्या दोन तासात नवरदेवाचा अचानक मृत्यू झाल्याने लग्नमंडपातील आनंदोत्सव क्षणात शोकामध्ये बदलला.
ADVERTISEMENT
मृत नवरदेवाचे नाव अमोल प्रकाश गोडबोले (वय ३२, रा. पुसला) असे आहे. तो पुसला येथील तलाठी कार्यालयात कोतवाल म्हणून कार्यरत होता. त्याचा विवाह नागपूर जिल्ह्यातील मोवाड येथील 26 वर्षीय युवतीशी ठरला होता. मनमिळाऊ स्वभावामुळे अमोलच्या लग्नाच्या तयारीला संपूर्ण गावानेच हातभार लावला होता. गावातील मंगल कार्यालयात 25 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता वाजत–गाजत विवाह पार पडला. मंगलाष्टके संपली, पाहुण्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आणि विधीसाठी सर्वजण व्यासपीठावर येण्यासाठी उत्सुक होते.
मात्र, आनंदाचे वातावरण असतानाच सुमारे दोन तासांनंतर अनपेक्षित घटना घडली. खुर्चीवर बसलेला नवरदेव अमोल अचानक खाली कोसळला. नातेवाइकांनी धावपळ करून त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात हलविले; परंतु तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अमोलला तीव्र हृदयविकाराचा झटका आला होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
ही घटना इतकी आकस्मिक होती की लग्नासाठी जमलेले दोन्ही पक्ष आणि वन्हाडी सैरभैर झाले. वधूपक्षातील मंडळी तर धक्क्यातून सावरू शकत नव्हती. काहींनी वधूसह मंडळींना मोवाडला परत जाण्याचा सल्ला दिला. पुसला येथील मंगल कार्यालयच अमोलच्या घराजवळ असल्याने विवाह सोहळा इथेच भरविण्याचे दोन्ही कुटुंबांनी ठरवले होते. मात्र तो आनंदमय सोहळा औटघटकेचा ठरला.
रुग्णालयातील तपासणीनंतर अमोलचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. त्यानंतर ते पुसला येथे आणण्यात आले. संध्याकाळी, ज्या लोकांसमोर विवाहाचे विधी पार पडले होते, त्यांच्याच उपस्थितीत अमोलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. काही तासांतच मंगलाष्टकांपासून शोकमंत्रापर्यंत पोहचलेला हा प्रसंग पाहून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. अमोलच्या आकस्मिक निधनामुळे पुसला गावावर दुःखाचे सावट पसरले असून वधू–वरांचे कुटुंबीय अत्यंत कोसळलेल्या अवस्थेत आहेत. सुखी संसाराची स्वप्ने इतक्या अचानक तुटल्याने दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अभिनेत्री सेलीना जेटलीचा पतीकडून शारीरीक छळ, हायकोर्टात धाव, पोटगीसाठी किती कोटी मागितले?
ADVERTISEMENT











