Andhra Pradesh stampede : आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील काशीबुग्गा येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात शनिवारी (दि.1) एकादशीच्या दिवशी मोठी चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला असून अनेक भाविक जखमी झाले आहेत.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक महिन्याच्या निमित्ताने मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक जमा झाले होते. गर्दी इतकी वाढली की स्थानिक प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापन परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकले नाही. अचानक ढकलाढकली सुरू झाल्याने चेंगराचेंगरी झाली. अनेक लोक एकमेकांच्या अंगावर पडले आणि गोंधळ उडाला. सध्या घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची व्यक्त केला शोक
मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या दुःखद घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं, “काशीबुग्गा येथील वेंकटेश्वर मंदिरातील चेंगराचेंगरी अत्यंत दुर्दैवी आहे. भाविकांच्या मृत्यूची घटना हृदयद्रावक आहे. मी मृतांच्या कुटुंबियांना मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो.” त्यांनी अधिकाऱ्यांना जखमींवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच स्थानिक प्रशासन आणि जनप्रतिनिधींनी घटनास्थळी जाऊन मदत व पुनर्वसन कार्यावर लक्ष ठेवावे, असेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पोलिस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत.
आंध्र प्रदेश CMO कडून माहिती
आंध्र प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “एकादशीच्या निमित्ताने मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने ही दुर्घटना घडली. पोलीस आणि प्रशासनाच्या टीम्स घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.” राज्याचे कृषी मंत्री के. अचन्नायडू तातडीने दुर्घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मंदिर आणि प्रशासनिक अधिकाऱ्यांशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली तसेच बचाव आणि मदतकार्याची पाहणी केली. मंत्र्यांनी आश्वासन दिले की, राज्य सरकार सर्व जखमींना उत्तम वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देईल आणि घटनेची सखोल चौकशी केली जाईल. सध्या अतिरिक्त पोलीस दल घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे, जेणेकरून गर्दीवर नियंत्रण ठेवता येईल आणि पुन्हा गोंधळ होऊ नये.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











