मुंबई: मुंबईच्या पवईतील आरए स्टुडिओमध्ये गुरुवार दुपारी (३० ऑक्टोबर २०२५) घडलेल्या भयानक अपहरणकांडाने संपूर्ण शहर हादरून गेलेलं. स्वतःला चित्रपट निर्माता म्हणवणारा रोहित आर्या याने 10 मुलांना एका स्टुडिओ बंधक बनवलं होतं. पोलिसांनी मुलांच्या सुटकेसाठी केलेल्या कारवाईत रोहित आर्यावर गोळीबार करण्यात आला. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला, तर सर्व बंधक सुखरूप सुटले. या घटनेनंतर आता एक आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. रोहित आर्याने काल एका मराठी अभिनेत्रीला देखील या स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी बोलावलं होतं. ज्याबाबतचे व्हॉट्सअॅप चॅटच त्या अभिनेत्री आता समोर आणले आहेत. जेव्हा रोहित आर्याने केलेलं अपहरण आणि एन्काउंटरमध्ये त्याचा झालेला मृत्यू या गोष्टी समोर आल्या तेव्हा या अभिनेत्रीला मोठा धक्का बसला.
ADVERTISEMENT
रोहित आर्या ज्या अभिनेत्रीला स्टुडिओमध्ये बोलवत होता तिचं नाव रुचिता जाधव असं आहे. तिने याबबात काही ही भावनिक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. ज्यामध्ये तिने सांगितलं की, रोहित आर्याने काही आठवड्यांपूर्वी एका 'होस्टेज' विषयक चित्रपटासाठी तिला बोलावलं होतं. पण काही कारणाने ही मीटिंग रद्द झाल्याने ती थोडक्यात बचावली. या घटनेने कामाच्या निमित्ताने नवीन लोकांना भेटताना सतर्क राहण्याची गरज असल्याचंही तिने यावेळी म्हटलं आहे.
रुचिता जाधव म्हणते, थोडक्यात बचावली
या घटनेच्या काही आठवड्यांपूर्वी रोहित आर्याने मराठी अभिनेत्री रुचिता जाधव हिच्याशी संपर्क साधला होता. 4 ऑक्टोबरला त्याने स्वतःला चित्रपट निर्माता असल्याचं तिला सांगितलं आणि 'होस्टेज सिच्युएशन'वर आधारित चित्रपटाची कल्पना सांगितली. अभिनेत्री म्हणून रुचिताने संभाषण पुढे चालू ठेवलं. २३ ऑक्टोबरला आर्याने २७, २८ किंवा २९ ऑक्टोबरला भेटण्याची विनंती केली. रुचिताने २८ तारखेला होकार दिला. २७ ऑक्टोबरला त्याने पवईतील स्टुडिओचा पत्ता पाठवला आणि दुसऱ्या दिवशी येण्याची विनंती केली.
हे ही वाचा>> "एअरगनने त्याने आधी फायर केलं..." रोहित आर्या केससंबंधी मुंबई पोलिसांची माहिती... स्टुडिओच्या आत नेमकं काय घडलं?
पण काही कौटुंबिक कारणामुळे रुचिताने ही मीटिंग रद्द केली. ३१ ऑक्टोबरला बातम्या पाहिल्यानंतर तिला आर्याचं नाव ओळखीचं वाटलं. ज्यानंतर इन्स्टाग्राम स्टोरीवर तिने भावनिक पोस्ट लिहिली: "मी थरथर कापत आहे. त्या दिवशी गेली असती तर काय झालं असतं? देव आणि कुटुंबीयांचे आभार. कामाच्या निमित्ताने नवीन लोकांना भेटताना अतिशय सतर्क राहा आणि कुटुंब किंवा मित्रांना कळवा."
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित आर्याने मराठीतील काही दिग्गज कलाकारांनाही ऑडिशनसाठी बोलावलं होतं.
नेमकं काय घडलेलं?
माहितीनुसार, रोहित आर्याने विविध भागांतून मुले व प्रौढांना 'वेब सिरीजसाठी ऑडिशन'च्या बहाण्याने आरए स्टुडिओत बोलावलं होतं. 11 वाजेच्या सुमारास ऑडिशन सुरू झालं. मुलांची छोटी ऑडिशन घेतल्यानंतर त्याने त्यांना एका खोलीत बंद केलं. रोहित आर्याने बाहेरून दरवाजा लावून घेतला आणि स्वतःवर आणि बंधकांवर हल्ला करण्याची धमकी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली होती. "मी आत्महत्या करण्याऐवजी या मुलांना बंधक बनवलं आहे. मला काही लोकांशी बोलायचं आहे, अन्यथा मी आणि हे मुले जळून मरू." असं तो म्हणाला होता.
हे ही वाचा>> Mumbai: धक्कादायक... मुंबईत मुलांना ओलीस ठेवलेल्या रोहित आर्याचा मृत्यू, पोलिसांनी थेट केला एन्काउंटर
व्हिडिओमध्ये तो असंही म्हणाला की, "माझी मागणी पैशाची नाही, तर नैतिक आणि नीतिक आहे. चुकीचा निर्णय घेतला तर मी सर्वकाही जाळून टाकीन." 
 
पवई पोलिसांना या सगळ्या प्रकाराबाबत काल दुपारी १.४५ वाजता माहिती मिळाली. तात्काळ क्विक रिस्पॉन्स टीम (क्युआरटी), बॉम्ब डिटेक्शन स्क्वॉड आणि फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झाली. दोन तास वाटाघाटी सुरू होत्या, पण आर्या हा धमक्या देत राहिला. शेवटी, आठ कमांडोनी बाथरूममधून स्टुडिओत घुसून 35 मिनिटांत मुलांची सुटका केली. आर्याने एअर गन पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात रोहित आर्याचा मृत्यू झाला.
यावेळी घटनास्थळावरून एअर गन, पेट्रोल, ज्वलनशील रबर द्रावण आणि लायटर सापडलं. पोलिसांनी भादंवि २०२३ च्या कलम १०९(१), १४० आणि २८७ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, तपास क्राईम ब्रांचकडे सोपवला आहे.
सर्व बंधकांची वैद्यकीय तपासणी झाली. मुलं सुखरूप आहेत, पण एका वृद्ध महिलेला डोक्यावर जखम आणि हातावर खोल जखम झाली आहे. तिच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
कोण होता रोहित आर्या?
रोहित आर्या हा पुण्यातील रहिवासी होता. तो स्वतःला सोशल एंटरप्रेन्युअर आणि चित्रपट निर्माता म्हणवीत. त्याने 'माझी शाळा, सुंदर शाळा' आणि 'स्वच्छता मॉनिटर' सारख्या शालेय प्रकल्पांसाठी महाराष्ट्र सरकारसोबत काम केलं होतं. त्याच्या मते, २०२३ मध्ये सुरू झालेल्या 'स्वच्छता मॉनिटर' संकल्पनेचे श्रेय त्याला मिळालेला नाही आणि २ कोटी रुपयांचे थकित पेमेंटही मिळालं नव्हतं.
याच संकल्पनेवर आधारित त्याचा चित्रपट 'लेट्स चेंज' होता, ज्यावरून त्याने प्रेरणा घेतली होती. माजी शिक्षणमंत्री दीपक केसकरकर यांच्याशी बोलण्याची मागणी करत तो उपोषणावर बसला होता, पण त्याला यश मिळालं नव्हतं.
आर्याने पूर्वीही अनेक आंदोलनं केली होती. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या आर्थिक दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप केला.
राजकीय प्रतिक्रिया आणि तपास
मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणी बोलताना सरकारवर जोरदार टीका केली. "आर्याने सरकारसोबत मोठे प्रकल्प केले होते, पण २ कोटींचे पेमेंट थकित राहिल्याने हे घडलं," असं त्या म्हणाल्या.
तर दुसरीकडे केसकर म्हणाले की, "आर्याने 'माझी शाळा, सुंदर शाळा' प्रकल्पात काम केलं होतं. सरकारची प्रक्रिया पारदर्शक आहे, पण अशी हिंसा चुकीची आहे."
ADVERTISEMENT


 होम
होम राजकीय आखाडा
राजकीय आखाडा गुन्ह्यांची दुनिया
गुन्ह्यांची दुनिया शहर-खबरबात
शहर-खबरबात राशीभविष्य-धर्म
राशीभविष्य-धर्म पैशाची बात
पैशाची बात फोटो बाल्कनी
फोटो बाल्कनी हवामानाचा अंदाज
हवामानाचा अंदाज टॉपिक
टॉपिक











