Ahilyanagar Crime : अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव (ता. कर्जत) येथील एका 60 वर्षीय वृद्धाचा आणि अकोला जिल्ह्यातील एका तरुणीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याच्या दोन धक्कादायक घटना स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणल्या आहेत. शेतजमिनीच्या वादातून पोटच्या मुलाने, सुनेने आणि जावयाने मिळून बापू आनंदा गाढवे (वय 60) यांची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार जावई सुनील रामदास राठोड आणि मुलगा आकाश बापू गाढवे यांना अटक केली असून, त्यांचे इतर साथीदार फरार आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Success Story : आई धुणीभांडी करायची, वडील वॉचमन; पुण्याच्या तरुणाने थेट UPSC परीक्षेत मिळवलं यश
तक्रार दाखल करणाऱ्या मुलानेच केला खून
या घटनेची पार्श्वभूमी अशी की, 5 मार्च 2026 रोजी आकाश बापू गाढवे याने आपले वडील बापू गाढवे हे बेपत्ता असल्याची तक्रार मिरजगाव पोलीस ठाण्यात दिली होती. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता आकाश गाढवे याच्यावरच संशय बळावला. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मृताचा जावई सुनील राठोड आणि इतर नातेवाईकांच्या मदतीने वडिलांचा खून केल्याची कबुली दिली. आरोपी सुनील राठोड हा शेगाव येथे लपला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे छापा टाकला. यावेळी पळून जाण्याच्या प्रयत्नात सुनील राठोड इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याने जखमी झाला, त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
शेतजमीन विकण्याला विरोध केल्याने हत्या
आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार, बापू गाढवे हे आपली शेतजमीन विकण्यास विरोध करत होते. याच रागातून 4 जानेवारी 2026 रोजी दुपारी दीडच्या सुमारास मुलगा आकाश, सून पायल ऊर्फ आकांक्षा आणि जावई सुनील राठोड यांनी अन्य साथीदारांच्या मदतीने बापू गाढवे यांचे तोंड दाबून व गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी घराशेजारील लाकडे गोळा करून डिझेलच्या साहाय्याने मृतदेह जाळून टाकला. याप्रकरणी मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा : 'मी बायको अन् मुलीला तलवारीने कापून काढलं', दोघींची हत्या केल्यानंतर बापाने थेट पोलीस स्टेशन गाठलं
तपासादरम्यान अजून एका खूनाचा उलगडा
तपासादरम्यान मुख्य आरोपी सुनील राठोड याने आणखी एका गुन्ह्याची कबुली दिली. त्याचे शीतल लिंबाजी सोंगेवाड (रा. परभणी) हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. शीतल ही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याने त्याने 16 नोव्हेंबर 2025 रोजी तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह अकोला जिल्ह्यातील धनेगाव (ता. बाळापूर) परिसरात अर्धवट जाळून टाकला होता. या कबुलीमुळे बाळापूर पोलीस ठाण्यातील खुनाचा गुन्हाही उघडकीस आला आहे. या संपूर्ण कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत चातुर्याने तपास करत दोन गंभीर गुन्हे मार्गी लावले असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
ADVERTISEMENT











