पुणे: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांना आज (1 ऑगस्ट) लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी पुण्याशी असलेलं आपलं खास नातं उलगडत बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तब्बल 76 वर्षांनंतर लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार स्वीकारण्याचा योग आला, हे आपलं मोठं भाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
ADVERTISEMENT
'माझं पुण्याशी 76 वर्षांपूर्वीचं नातं'
यावेळी अजित डोवाल यांनी त्यांचं पुण्याशी जुनं नातं असल्याचं म्हणत काही आठवणींना उजाळाही दिला.
ते म्हणाले की, सुमारे 76 वर्षांपूर्वी त्यांचे वडील सैन्यात कार्यरत असल्यामुळे त्यांची बदली पुण्यात झाली होती. त्यावेळी ते लहान होते आणि त्यांनी पुण्यातच आपल्या शालेय शिक्षणाची सुरुवात केली. जवळपास दीड वर्ष ते पुण्यात वास्तव्यास होते. त्यानंतर त्यांच्या वडिलांची बदली दिल्लीतील आर्मी मुख्यालयात झाल्याने आमचं कुटुंब पुणे सोडून गेलं.
'चतुःश्रृंगी मंदिराच्या आठवणी आजही ताज्या'
पुढे बोलताना डोवाल यांनी सांगितलं की, 'त्या काळातील अनेक गोष्टी विसरल्या असल्या तरी दोन आठवणी आजही मनात कायम आहेत.'
'पहिली आठवण म्हणजे त्यांच्या आईसोबत दर मंगळवारी चतुःश्रृंगी मंदिरात जाण्याची. मंदिरात देवीला गोड आणि मोठी पारंपरिक पोळीचा नैवेद्य अर्पण केला जात असे. घरी परतल्यानंतर तो प्रसाद खाण्याचा आनंद आजही विसरता येत नाही.' असं त्यांनी सांगितलं. पुढे डोवाल असंही म्हणाले की, त्यांच्या आईची चतुःश्रृंगी देवीवर अतूट श्रद्धा होती.
'शाळेतील शिक्षकांनी करून दिली लोकमान्य टिळकांची ओळख'
दुसरी आठवण त्यांनी आपल्या शाळेतील प्रार्थना सभेची सांगितली. 'दररोज सकाळच्या प्रार्थनेनंतर वरिष्ठ शिक्षक विद्यार्थ्यांना नैतिकता, महान व्यक्तिमत्त्वांचे जीवन, विद्यार्थ्यांची कर्तव्ये अशा विषयांवर मार्गदर्शन करत असत.'
हे ही वाचा>> 'तुम्ही कधीही चुकणार नाही, ही माझी गॅरंटी...' अमित शहांचा देशातील तरुणांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?
'याच काळात हिंदी शिक्षकांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर प्रभावी एक भाषण केलं होतं. याच भाषणातून प्रथमच मला लोकमान्य टिळकांविषयी माहिती मिळाली आणि पुढे त्यांच्या जीवनाविषयी अधिक जाणून घेण्याची प्रेरणा मिळाली. त्यावेळी मी अवघ्या पाच वर्षांचा होतो.'
'हा पुरस्कार मिळणं माझं मोठं भाग्य'
अजित डोवाल म्हणाले की, 'पाचव्या वर्षी लोकमान्य टिळकांविषयी पहिल्यांदा ऐकलं आणि तब्बल 76 वर्षांनंतर त्यांच्याच स्मरणार्थ सुरू करण्यात आलेला राष्ट्रीय पुरस्कार पुण्यात येऊन स्वीकारण्याची संधी मिळेल, अशी कल्पनाही कधी केली नव्हती.'
हे ही वाचा>> "दुसऱ्यांनाही आई असते, हे तुमच्या पक्षातील लोकांना...", राज ठाकरेंचं पीएम मोदींना प्रत्युत्तर
'आज हा सन्मान स्वीकारताना मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो. हा माझ्यासाठी मोठा सन्मान असून मी स्वतःला भाग्यवान समजतो," अशा शब्दांत अजित डोवाल आणि पुणे आणि लोकमान्य टिळकांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अजित डोवालांच्या भाषणातील ठळक मुद्दे
- NSA अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 प्रदान.
- भाषणात पुण्याशी असलेलं 76 वर्षांपूर्वीचं नातं उलगडलं.
- चतुःश्रृंगी मंदिर आणि आईसोबतच्या आठवणींना दिला उजाळा.
- शाळेतील हिंदी शिक्षकांमुळे प्रथम लोकमान्य टिळकांविषयी माहिती मिळाल्याचा उल्लेख.
- "76 वर्षांनंतर टिळकांच्या नावाचा पुरस्कार मिळणं हे माझं भाग्य," अशी भावना व्यक्त.
ADVERTISEMENT












