Success Story : आई धुणीभांडी करायची, वडील वॉचमन; पुण्याच्या तरुणाने थेट UPSC परीक्षेत मिळवलं यश
Success Story : नोकरी करत असतानाही प्रशासकीय सेवेत जाऊन समाजाची सेवा करण्याचे स्वप्न त्याच्या मनात जिवंत होते. अखेर 2017 मध्ये त्याने पूर्ण ताकदीनिशी यूपीएससीचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि दिल्ली गाठली. दिल्लीत राहून आपल्या मित्रांच्या मदतीने त्याने दररोज 8 ते 10 तास अभ्यासाचा सराव केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
Success Story : आई धुणीभांडी करायची, वडील वॉचमन
पुण्याच्या तरुणाने थेट UPSC परीक्षेत मिळवलं यश
Success Story : जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर कशी मात करता येते, याचा आदर्श पुण्यातील बापूसाहेब रतन गायकवाड या तरुणाने घालून दिला आहे. बापूसाहेब गायकवाड याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेत बापूसाहेबने 561 वा क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या बापूसाहेबचा हा प्रवास सोपा नव्हता. ज्या वेळी घरात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती, अशा काळातही त्याने आपले ध्येय ढळू दिले नाही. बापूसाहेबची आई दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी करून संसाराला हातभार लावत होती, तर वडील वॉचमन म्हणून रात्रंदिवस कर्तव्य बजावत होते. पालकांच्या कष्टाचे चीज करत बापूसाहेबने मिळवलेले हे यश केवळ गायकवाड कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी अभिमानास्पद ठरले आहे.
हेही वाचा : 'मला चार वर्ष बायको बनवून ठेवलं अन्..', पोलीसासोबत चार वर्ष Live-in मध्ये राहणाऱ्या तरुणीने आयुष्य संपवलं
बापूसाहेब या तरुणाचा शैक्षणिक आणि संघर्षाचा प्रवास थक्क करणारा आहे. 2004 ते 2009 हा काळ त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत कठीण होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबाला आधार देण्यासाठी बापू याला मुंबईतील एका खासगी कंपनीत तब्बल पाच वर्षे नोकरी करावी लागली. मात्र, नोकरी करत असतानाही प्रशासकीय सेवेत जाऊन समाजाची सेवा करण्याचे स्वप्न त्याच्या मनात जिवंत होते. अखेर 2017 मध्ये त्याने पूर्ण ताकदीनिशी यूपीएससीचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि दिल्ली गाठली. दिल्लीत राहून आपल्या मित्रांच्या मदतीने त्याने दररोज 8 ते 10 तास अभ्यासाचा सराव केला. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरणास्थान मानून त्याने अभ्यासाचे सातत्य राखले, ज्याचा परिणाम आज निकालाच्या रूपाने सर्वांसमोर आहे.
संघर्षातून यशाचे शिखर आणि कुटुंबीयांचा भक्कम आधार
कोणत्याही मोठ्या यशामागे कौटुंबिक पाठबळ महत्त्वाचे असते, याची प्रचिती बापूसाहेबच्या उदाहरणावरून येते. या संपूर्ण प्रवासात त्याला त्याच्या मोठ्या भावाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, जे स्वतः केंद्रीय विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय त्याचे आई-वडील, मेहुणे आणि दिल्लीतील मित्र परिवाराने त्याला मानसिक आणि आर्थिक बळ दिले. सुरुवातीच्या काळात अनेक अपयशांचा सामना करावा लागला तरी, ध्येय गाठल्याशिवाय थांबायचे नाही हा निश्चय त्याने केला होता. बापूसाहेबच्या मते, "जर तुमच्याकडे स्पष्ट ध्येय आणि ते पूर्ण करण्याची जिद्द असेल, तर परिस्थिती कधीही तुमच्या आड येत नाही." आज गायकवाड कुटुंबातील दोन मुले सरकारी सेवेत उच्च पदावर कार्यरत झाल्याने, त्यांच्या संघर्षाच्या काळोखात यशाचा प्रकाश पसरला आहे.










