Pune Crime : पुणे शहरात सिग्नलवर वाहनचालकांचे लक्ष विचलित करून मोबाईल व मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या ‘टक-टक गँग’चा पर्दाफाश करण्यात पुणे गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांनी शहरातील अनेक चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-1 पथकाने ही कारवाई केली. आरोपी सिग्नल किंवा गर्दीच्या ठिकाणी चारचाकी वाहनाजवळ जाऊन काचेवर टक-टक करत चालकाचे लक्ष वेधत असत. वाहनाने धडक दिल्याचा बहाणा करून चालकासोबत वाद घालताना त्याचे लक्ष दुसरीकडे वळवले जात असे. याच दरम्यान कारमधील मोबाईल फोन आणि इतर मौल्यवान वस्तू चोरी केल्या जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
ADVERTISEMENT
सापळा रचून अटक
या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे शाखेने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रविवारी ओमप्रकाश कोहली (वय 38) आणि अफझल कय्युम अब्बासी (वय 38) अशी असून ते दोघेही मेरठ येथील रहिवासी आहेत.
गुन्ह्याची कबुली
चौकशीदरम्यान त्यांनी फरासखाना परिसरातील मोबाईल चोरीची कबुली दिली. तसेच कर्वे रोड परिसरात उभी असलेल्या कारमधून आयफोन आणि रोख रक्कम चोरी केल्याचे उघड झाले आहे. याशिवाय विमाननगर चौकात कारचालकाला 'गाडी पायावर गेली' असा बहाणा करून सॅमसंग व वनप्लस कंपनीचे मोबाईल चोरल्याचीही माहिती समोर आली आहे.
आरोपी फरासखाना पोलिसांच्या ताब्यात
फरासखाना, अलंकार आणि विमाननगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अशा प्रकारचे अनेक गुन्हे केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी फरासखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव आणि त्यांच्या पथकाने केली.
ADVERTISEMENT











