Government Jobs : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण विभागामार्फत अप्रेंटिसशिपसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 407 पदांसाठी ही भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेत कोपा (COPA), तारतंत्री, वीजतंत्री, प्लंबर, आणि मेकॅनिक मोटर व्हेईकल यांसारख्या एकूण 12 विविध समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक 106 जागा कोपा व्यवसायासाठी, तर 87 जागा तारतंत्री आणि 80 जागा वीजतंत्री या पदांसाठी राखीव आहेत.
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार सरकारमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) संबंधित विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, केवळ सन 2023, 2024 आणि 2025 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येईल. इच्छुक उमेदवारांनी प्रथम www.apprenticeshipindia.gov.in (NAPS Portal) या संकेतस्थळावर आपली 100% प्रोफाईल अपडेट करून ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच, कोपा व्यवसायासाठी मराठी किंवा इंग्रजी टंकलेखन (Typing) उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना निवडीत प्राधान्य दिले जाईल.
हे ही वाचा : मिसिंग लिंकवरुन जाण्यास 'या' वाहनांना बंदी, वेग मर्यादा किती? कधी होणार खुला? शासनाकडून अधिसूचना जारी
'असा' करा अर्ज
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 27 एप्रिल पासून सुरू झाली असून 6 मे पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येतील. पोर्टलवर यशस्वीपणे अर्ज केल्यानंतर उमेदवारांनी अर्जाची प्रत आणि सर्व मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रती मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण विभागात 8 मे पर्यंत कार्यालयीन वेळेत समक्ष जमा करणे आवश्यक आहे. यामध्ये 10 वी, 12 वी आणि आयटीआयची गुणपत्रके, जातीचा दाखला, आधार कार्ड आणि बँक पासबुक यांसारख्या कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक असून टपालाने किंवा ईमेलने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
हे ही वाचा : धाराशिव : महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमातच घेतलं पेटवून, भूविकास बँकेच्या महिला कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल
बँक खाते आधारशी लिंक असणे गरजेचे
निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र शासनाच्या सुधारित दरानुसार विद्यावेतन दिले जाईल आणि राज्य शासनाच्या 'मॅप्स' (MAPS) योजनेचा लाभही घेता येईल. उमेदवारांचे बँक खाते आधारशी लिंक असणे आणि 'डीबीटी' (DBT) साठी सक्षम असणे गरजेचे आहे, अन्यथा विद्यावेतन मिळण्यास अडचण येऊ शकते. प्रशिक्षणादरम्यान बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य असून, प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतरच उमेदवारांना प्रमाणपत्र दिले जाईल. भरती प्रक्रियेबाबतची अधिक माहिती महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT











