मुंबईच्या महापौर रितू तावडेंसमोरच BMC चा अधिकारी थेट पडला मॅनहोलमध्ये.. Video प्रचंड व्हायरल

Video Viral: मुंबईत मान्सून सक्रिय होताच पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महापौर रितू तावडे आणि BMC अधिकारी आले होते. मात्र पाहणीदरम्यान महापौरांसमोरच एक BMC अधिकारी उघड्या मॅनहोलमध्ये पडला ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत होता.

bmc official fell straight into a manhole right in front of mumbai mayor and bjp leader ritu tawde video has gone viral

महापौर रितू तावडे पावसादरम्यान मुंबईत पाहणी करताना (फोटो सौजन्य: फेसबुक)

मुंबई तक

• 08:01 PM • 24 Jun 2026

follow google news

मुंबई: मुंबईत मान्सून सक्रिय होताच मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या हालअपेष्टा वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत शहरातील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawade)आणि BMC अधिकारी विविध भागांत दौरा करत होते. मात्र, या पाहणीदरम्यान घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले आहे.

हे वाचलं का?

गांधी मार्केट परिसरातील पाणी साचलेल्या भागांची पाहणी सुरू असताना महापौरांच्या उपस्थितीतच BMC चा एक कर्मचारी अचानक उघड्या मॅनहोलमध्ये पडला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नेमकी घटना काय घडली?

बुधवारी सकाळी मुसळधार पावसानंतर दादर, हिंदमाता, गांधी मार्केट आणि इतर पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी महापौर रितू तावडे घटनास्थळी पोहोचल्या होत्या. यावेळी ड्रेनेज व्यवस्थेची पाहणी सुरू असताना BMC चा एक अधिकारीच उघड्या नाल्याजवळ अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट मॅनहोलमध्ये कोसळला.

हे ही वाचा>> Monsoon Update: अखेर ‘तो’ आला... मुंबईकर सुखावले, कुठे रेड आणि ऑरेंज अलर्ट?

घटना घडताच तेथे उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत अधिकाऱ्याला बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये संताप

घटनेचा व्हिडिओ काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेक नागरिकांनी मुंबईतील उघडे मॅनहोल, गटारे आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यावर संताप व्यक्त केला आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशाच प्रकारच्या घटना घडत असूनही प्रशासनाने पुरेशी खबरदारी घेतली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

हे ही वाचा>> मुंबई : लोकलमध्ये तरुणाची चाकू भोसकून हत्या, दरवाजा बंद करण्यावरुन वाद अन् भयानक घडलं!

महापौरांचा अधिकाऱ्यांना इशारा

घटनेनंतर महापौर रितू तावडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. शहरात कुठेही उघडा मॅनहोल आढळल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर निलंबनासह कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

महापौरांनी सांगितले की, संबंधित मॅनहोलचे झाकण कचरा काढण्यासाठी उघडण्यात आले होते आणि त्या ठिकाणी सूचना फलक व बॅरिकेड्स लावण्यात आले होते. मात्र, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी अतिरिक्त खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मान्सून तयारीवर पुन्हा प्रश्न

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच महापौरांनी मुंबईतील नालेसफाई आणि मान्सून पूर्व कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्याचा दावा केला होता. शहरातील 80 टक्क्यांहून अधिक नालेसफाईचे काम पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र, मान्सूनच्या पहिल्याच मोठ्या पावसानंतर अनेक भागांमध्ये जलमय परिस्थिती निर्माण झाली.

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात उघडे मॅनहोल, पाणी साचणे आणि रस्त्यांची दुरवस्था हे प्रश्न पुन्हा समोर येतात. यामुळे नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होतो. महापौरांसमोरच BMC कर्मचारी मॅनहोलमध्ये पडल्याची घटना ही प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी अधोरेखित करणारी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.