Mumbai News : मुंबईत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या एका नागरी पाहणी दौऱ्यादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, पाहणी करत असलेला एक पालिका कर्मचारी अचानक एका उघड्या नाल्यात पडला. ही घटना घडताच घटनास्थळी एकच खळबळबळ उडाली. सुदैवाने तेथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
ADVERTISEMENT
महापौरांसमोरच नाल्यात पडला कर्मचारी
हा प्रकार मुंबईतील माटुंगा परिसरात घडला. शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेली जलमय स्थिती आणि ड्रेनेज व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महापौर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यादरम्यान तो पालिका कर्मचारी नाल्याजवळ तपासणीचे काम करत असताना, अचानक त्याचा पाय घसरला आणि तो थेट उघड्या नाल्यात पडला. ही संपूर्ण घटना तेथे उपस्थित असलेले अधिकारी आणि पोलिसांच्या समोर घडली असून ती कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.
हे ही वाचा : मुंबई : लोकलमध्ये तरुणाची चाकू भोसकून हत्या, प्रवासी घाबरले, कोणाला काही समजेना
अचानक तोल गेला अन्...
मुंबईत सतत होणाऱ्या पावसामुळे सखल भागात साचलेले पाणी आणि नाल्यांची सद्यस्थिती तपासण्यासाठी महापौर आणि पालिका अधिकारी या भागाची पाहणी करत होते. यावेळी हा कर्मचारी नाल्याच्या अगदी कडेला राहून आपले काम चोख बजावत होता. मात्र, काम करत असतानाच त्याचा तोल गेला आणि तो अचानक नाल्याच्या वाहत्या पाण्यात कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पाहणी दौऱ्यात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
हे ही वाचा : केतन अग्रवालची हत्या करणारी सिया गोयल नेमकी आहे तरी कोण?
मुंबईकरांनी पावसाचा आनंद घ्यावा
या पाहणी दौऱ्यादरम्यान एनआयशी बोलताना त्यांनी सांगितले की, 'दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यानंतर पावसाचे आगमन झाले ही चांगली गोष्ट आहे. मुंबईकरांनी याचा आनंद घ्यावा.' दरम्यान, कर्मचारी नाल्यात पडल्याचे पाहताच तेथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि इतर अधिकाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. सर्वांनी मिळून लगेच बचावकार्य सुरू केले आणि अत्यंत सतर्कतेने त्या कर्मचाऱ्याला सुखरूप बाहेर काढले.
या घटनेत कर्मचाऱ्याला नेमकी किती दुखापत झाली आहे, याबाबत अद्याप कोणतीही सविस्तर माहिती मिळालेली नाही. मात्र, या घटनेमुळे पावसाळ्यात आणि प्रतिकूल परिस्थितीत मुंबईतील ड्रेनेज व्यवस्था साफ करणाऱ्या व त्यांची पाहणी करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा आणि त्यांच्यासमोरील जोखमीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे
ADVERTISEMENT











