Barshi Crime : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एका गरोदर महिलेला पोलिसांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून प्रकरणाची तक्रार राज्य मानवाधिकार आयोगाकडे दाखल करण्यात आली आहे. संबंधित महिलेनं सविस्तर निवेदन देत पोलिसांच्या वागणुकीमुळे आपल्यावर शारीरिक व मानसिक परिणाम झाल्याचा आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार महिला आपल्या बहिणीकडे काही दिवसांसाठी राहायला आली होती. घटनेच्या दिवशी तिचे नातेवाईक कोणी बाजारात तर कोणी पोल्ट्रीत कामानिमित्त होते. ती स्वतः पटांगणात मुलांसोबत बसली असताना चार ते पाच पोलीसांच्या गाड्या गावात आल्या. या गाड्यांतून अंदाजे पंचवीस ते तीस पोलीस उतरले होते. काहीजण वर्दीत तर काहीजण साध्या कपड्यांत होते. विशेष म्हणजे, या पथकात एकही महिला पोलीस नव्हती.
यावेळी पोलिसांनी उपस्थित असलेल्या पुरुष नातेवाईकांना ताब्यात घेऊन गाडीत बसवले. त्यानंतर काही पोलिसांनी घरात जाऊन घरातील साहित्य विस्कटले, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे, त्यांची यंत्रणा, टीव्ही स्क्रीन, रोख रक्कम, घरातील कागदपत्रे, इतर वस्तू, तसेच साठवलेले काही माल या सर्व वस्तू गाडीत ठेवून नेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदार महिलेचा आरोप आहे की, पोलिसांनी तिची चौकशी करताना मारहाण केली. तिने गरोदर असल्याचे सांगूनही तिच्या पाठीत, मांडीवर व शरीराच्या इतर भागांवर काठीने मारहाण झाल्याचा दावा तिने केला आहे. तसेच तिच्या कपड्यांचा अपमानास्पद पद्धतीने गैरवापर करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे. तिने सांगितले की, ती विनवणी करत असतानाही पोलिसांनी मारहाण थांबवली नाही. मारहाणीनंतर प्रकृती बिघडू लागल्याने ती दोन दिवस घरात भीतीमुळेच थांबली. नंतर 19 नोव्हेंबर रोजी तिने शासकीय रुग्णालयात उपचार घेतले. घटनेनंतर पीडित महिला व तिचे नातेवाईक पोलिसांच्या दहशतीखाली आहेत, असेही पीडित महिलेने सांगितले.
मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल
तक्रारीत महिलेने मानवाधिकार आयोगाला विनंती केली आहे की, घटनेच्या दिवशी बार्शी तालुका पोलीस ठाणे आणि वैराग पोलीस ठाणे येथील सर्व सीसीटीव्ही फुटेज जप्त करून सखोल चौकशी करावी, कारण पुरावे नष्ट होण्याची शक्यता असल्याचा तिचा दावा आहे. तसेच संबंधित पोलिसांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, मानवाधिकार कायदा आणि भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तिने केली आहे.
या प्रकरणाबाबत महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगालाही स्वतंत्र तक्रार पाठवण्यात आली आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांनीही या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, स्थानिक पातळीवर या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत असून गरोदर महिलेला पोलिसांकडून मारहाण झाल्याचे आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याने याची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
डॉक्टरांनी औषधं दिली, महिलेने पाकीट उघडताच कॅप्सुलमधून अळ्या बाहेर, कल्याणमधील धक्कादायक प्रकार
ADVERTISEMENT











