कोडीनार, गुजरात : गीर सोमनाथ जिल्ह्यात मतदार याद्यांशी संबंधित कामाचा वाढलेला ताण एका शिक्षकाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) म्हणून नियुक्त झालेल्या शिक्षक अरविंद वाढेर यांनी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, एसआयआर (स्पेशल समरी रिव्हिजन) प्रक्रियेतील प्रचंड कामाचा ताण आणि मानसिक दबावामुळे त्यांनी हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलले.
ADVERTISEMENT
घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद वाढेर हे शनिवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास आपल्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. तात्काळ त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. निवडणूक आयोगाच्या कामकाजाचा भाग म्हणून त्यांची एसआयआरसाठी बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मतदार यादीत दुरुस्त्या करणे, पडताळणी करणे आणि नवीन नावे समाविष्ट करण्यासारखी जबाबदारी त्यांच्या अंगावर होती.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात थंडीसह ढगाळ वातावरणाचा इशारा, स्वेटरसह छत्री देखील काढा बाहेर
कुटुंबियांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून वाढेर अत्यंत तणावाखाली होते. सकाळी लवकर घराबाहेर पडणे, दिवसभर मतदार नोंदींची तपासणी, दुरुस्ती आणि नोंदींची पूर्तता यामुळे त्यांच्यावर कामाचा प्रचंड भार पडला होता. मानसिक आणि शारीरिक थकवा वाढत चालल्याने त्यांचे आरोग्यही बिघडू लागले असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या वाढत्या दडपणामुळेच त्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
घटनास्थळावरून पोलिसांना एक चिठ्ठीही मिळाली आहे. ती त्यांनी पत्नीला उद्देशून लिहिल्याचे समजते. त्या चिठ्ठीत त्यांनी एसआयआरचे काम आपल्या आवाक्याबाहेर असल्याचे नमूद केले आहे. “मागील काही दिवसांपासून मी अत्यंत थकलो आहे. या कामाचा मानसिक ताण मला सहन होत नाही. मुलांची काळजी घ्या,” असे हृदयद्रावक शब्द त्यांनी लिहिले आहेत. त्यांच्या या पत्राने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. शिक्षकांवर निवडणूकसंबंधित अतिरिक्त कामाचा भार वाढत चालल्याबद्दल अनेकदा तक्रारी समोर आल्या आहेत. या घटनेनंतर बीएलओंच्या कामाच्या स्वरूपावर आणि दडपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शिक्षक संघटनांनीही या घटनेची गंभीर दखल घेत बीएलओंसाठी योग्य कार्यव्यवस्था आणि समुपदेशनाची गरज असल्याचे सांगितले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, वाढेर यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेलेल्या 7 वर्षीय मुलासोबत नको ते, 30 वर्षीय विकृत तरुणाचं घाणेरडं कृत्य
ADVERTISEMENT











