Ahilyanagar Politics : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापलेले असतानाच एक खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रभाग क्रमांक 15 मधून नगरसेवक पदाचे उमेदवार आणि शिवसेना (शिंदे गट) जिल्हा अध्यक्ष अनिल शिंदे यांच्या राहत्या घरावर प्रशासन आणि पोलिसांच्या पथकाने अचानक धाड टाकली. या अचानक कारवाईमुळे अनिल शिंदे यांना तीव्र मानसिक तणाव आला आणि त्याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि.13) सायंकाळी सुमारे 7 ते 8 वाजण्याच्या सुमारास घडली.
ADVERTISEMENT
निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे पथक आणि पोलिस अनिल शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचले. अचानक झालेल्या या धाडीमुळे शिंदे प्रचंड अस्वस्थ झाले. काही वेळातच त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्याने कुटुंबीय आणि उपस्थितांनी तातडीने त्यांना अहिल्यानगरमधील आनंद श्रृषीजी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी शिंदे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेची माहिती पसरताच शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा : 'फडणवीस म्हणतात अण्णामलाई 'तसं' म्हणालेच नाही ..', राज ठाकरेंकडून लाव रे तो व्हिडिओ.. फडणवीसांवर पडले तुटून!
दरम्यान, अनिल शिंदे हे मागील काही दिवसांपासून सातत्याने प्रशासनावर आणि सत्ताधारी पक्षांवर आरोप करत होते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपकडून आपल्यावर दबाव आणला जात असून विविध कारणांनी त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी जाहीरपणे केला होता. अशा पार्श्वभूमीवरच प्रशासनाने अचानक त्यांच्या घरावर धाड टाकल्याने हा प्रकार राजकीय हेतूने करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर शिंदे यांच्या पत्नी आणि मुलाने प्रशासनाच्या कारवाईवर गंभीर आरोप केले आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक धाड टाकण्यात आली, त्यामुळेच अनिल शिंदे यांना हा धक्का सहन झाला नाही, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. “निवडणुकीत दबाव टाकण्यासाठीच ही कारवाई करण्यात आली,” असा दावा त्यांनी केला आहे.
घटनेची माहिती मिळताच शहरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने आनंद श्रृषीजी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. रुग्णालय परिसरात एकच गर्दी झाली असून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, प्रशासनाने ही धाड नियमांनुसार असल्याचे सांगितले असले तरी नेमकी कोणत्या कारणासाठी ही कारवाई करण्यात आली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. या संपूर्ण घटनेमुळे अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचे पडसाद अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











