Pune Crime News : पुणे येथील वाकड परिसरात एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरची तब्बल 42.64 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ऑनलाईन मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून आरोपीने महिलेशी संपर्क साधला आणि आपण भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) शास्त्रज्ञ असल्याचे खोटे सांगून तिचा विश्वास संपादन केला. लग्नाचे आमिष दाखवून आणि भविष्यात एकत्र मालमत्ता खरेदी करण्याच्या बहाण्याने त्याने या तरुणीला आर्थिक जाळ्यात ओढले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : रंग खेळून नदीवर गेला अन् परतलाच नाही, वैनगंगेत बुडून इंजिनिअरचा मृत्यू; अंत्यसंस्कारासाठी लाकडंच मिळेनात
42.64 लाख रुपये खात्यावर वळवले
मिळालेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय पीडित तरुणी हिंजवडीतील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये तिची ओळख मॅट्रिमोनियल वेबसाईटवर जयेश पाटील नावाच्या व्यक्तीशी झाली. या आरोपीने आपण शास्त्रज्ञ असल्याचे भासवून तरुणीला लग्नाची मागणी घातली. इतकेच नव्हे तर, त्याने वाकड येथे येऊन तिची भेटही घेतली, ज्यामुळे तरुणीचा त्याच्यावर विश्वास बसला. नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत त्याने विविध कारणांसाठी महिलेकडून तब्बल 42.64 लाख रुपये स्वतःच्या खात्यावर वळवून घेतले.
सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने तातडीने ऑनलाईन तक्रार नोंदवली. वाकड पोलिसांनी याप्रकरणी तातडीने पावले उचलत आरोपीच्या खात्यावरील 16.65 लाख रुपये गोठवून ते हस्तगत केले आहेत, तर उर्वरित 27 लाख रुपयांचा शोध सुरू आहे. तपासादरम्यान आरोपीची खरी ओळख जयेश पाटील उर्फ आदर्श म्हात्रे (निवासी अलिबाग, रायगड) अशी पटली असून, तो सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. सुशिक्षित महिलांना लक्ष्य करून त्यांची फसवणूक करणे आणि त्या पैशातून गोव्यातील कॅसिनोमध्ये चैनीचे आयुष्य जगणे हा त्याचा छंद होता.
हे ही वाचा : गोंदिया : रंग खेळून अंघोळीसाठी तलावावर गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
आरोपीला पोलिस कोठडी
सध्या हा आरोपी नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून त्याला 4 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नवी मुंबईतील एका अन्य फसवणुकीच्या प्रकरणात त्याला आधीच अटक करण्यात आली होती. त्याची रिमांड संपल्यानंतर वाकड पोलीस त्याला ताब्यात घेणार असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे मॅट्रिमोनियल साईट्सवर जोडीदार शोधताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT











