रंग खेळून नदीवर गेला अन् परतलाच नाही, वैनगंगेत बुडून इंजिनिअरचा मृत्यू; अंत्यसंस्कारासाठी लाकडंच मिळेनात

मुंबई तक

04 Mar 2026 (अपडेटेड: 04 Mar 2026, 09:02 AM)

Gadchiroli News : रंगांचा उत्सव सुरू असतानाच गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहरात आज एक मोठी शोककळा पसरली. मित्रांसोबत वैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या 25 वर्षीय तरुण अभियंत्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शुभम नामदेव रामटेके (रा. गायकवाड चौक, आरमोरी) असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे रामटेके परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Gadchiroli News

Gadchiroli News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

गडचिरोली : रंग खेळून नदीवर गेला अन् परतलाच नाही

point

वैनगंगेत बुडून इंजिनिअरचा मृत्यू

point

अंत्यसंस्कारासाठी लाकडंच मिळेनात

Gadchiroli News, व्येकटेश दुडमवार : रंगांचा उत्सव सुरू असतानाच गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहरात आज एक मोठी शोककळा पसरली. मित्रांसोबत वैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या 25 वर्षीय तरुण अभियंत्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शुभम नामदेव रामटेके (रा. गायकवाड चौक, आरमोरी) असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे रामटेके परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील 'या' चार जिल्ह्यांना उन्हाचा चटका, IMD चा महत्त्वाचा अलर्ट

शोध मोहिम राबवून मृतदेह बाहेर काढला

शुभमने आपल्या मित्रांसोबत रंगोत्सव साजरा केला. त्यानंतर रंगाने माखलेले शरीर स्वच्छ करण्यासाठी सर्व मित्र सकाळी वैनगंगा नदीच्या पात्रात आंघोळीला गेले होते. पोहत असताना नदीच्या खोलीचा अंदाज न आल्याने शुभम खोल पाण्यात ओढला गेला. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र पाण्याचा प्रवाह आणि खोलीमुळे त्यांना यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम राबवून शुभमचा मृतदेह बाहेर काढला.

दोनच महिन्यांपूर्वी नामांकित कंपनीत नियुक्ती

शुभमचा हा अपघाती मृत्यू संपूर्ण शहरासाठी चटका लावून जाणारा ठरला आहे. त्याचे वडील नामदेव रामटेके हे भंगाराचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत प्रतिकूल आणि हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी मुलाला अभियांत्रिकीचे (Engineering) शिक्षण दिले होते. अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच शुभमची एका नामांकित कंपनीत नियुक्ती झाली होती. कुटुंबाचा आर्थिक आधार बनण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हे ही वाचा : गोंदिया : रंग खेळून अंघोळीसाठी तलावावर गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

अंत्यसंस्कारासाठी लाकडांची टंचाई

​एकीकडे मृत्यूचे दुःख असताना दुसरीकडे आरमोरी येथील वनविभागाच्या डेपोमध्ये जळाऊ लाकडांची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. आरमोरीत लाकडे उपलब्ध नसल्याने नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यातील मेंडकी (ता. ब्रह्मपुरी) येथे धाव घ्यावी लागत आहे. 'आरमोरी वनविभागाच्या बीटमध्ये जळाऊ लाकडे उपलब्ध नसणे ही गंभीर बाब आहे. जर प्रशासनाने तात्काळ लाकडांची सोय केली नाही, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,' असा इशारा पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. अमोल मारकवार यांनी दिला आहे.