सोलापूर : बार्शी तालुक्यातील शेळगाव येथे गुरुवारी (दि.27) दुपारी एक अत्यंत दुःखद आणि हादरवणारी घटना घडली. अवघ्या चार वर्षांच्या शिवराज संदीप शेरखाने या चिमुकल्याचा ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळून मृत्यू झाला. गावात विहिरीतून मोटार बाहेर काढण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली असून स्थानिक नागरिकांसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
ADVERTISEMENT
घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, शेळगाव परिसरातील एका विहिरीचे काम सुरू होते. या कामासाठी विहिरीलगत एक ट्रॅक्टर उभा करण्यात आला होता. दरम्यान, आसपास खेळत असलेला छोटा शिवराज कुतूहलाने ट्रॅक्टरवर चढला. खेळताना त्याच्या हातून चुकून गिअर पाय पडला आणि क्षणभरात ट्रॅक्टर थेट विहिरीत घसरत खाली पडला. सर्व काही इतक्या वेगाने घडले की उपस्थित लोकांना काहीच सुचले नाही. विहिरीच्या खोल तळाशी ट्रॅक्टर अडकल्याने मुलाला वाचवण्याची कोणतीही शक्यता राहिली नाही.
हेही वाचा : निलेश राणेंचा धमाका, भाजप नेत्याच्या घरावर धाड, प्रचाराची धामधूम सुरु असताचा बेहिशोबी 25 लाख सापडले
चिमुकल्याला वाचवण्यासाठी वडिलांचे जीव तोडून प्रयत्न, गावकरीही एकवटले
अपघात होताच शिवराजचे वडील संदीप शेरखाने घटनास्थळाकडे धावले आणि मुलाला बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. गावातील युवकांनीदेखील जीवाची पर्वा न करता विहिरीत उड्या मारून शोधकार्याला सुरुवात केली. काही क्षणांतच अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली. मात्र, खोल पाणी, चिखल आणि ट्रॅक्टरचा अडथळा यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण झाले.
12 तासांचे रेस्क्यू ऑपरेशन; दुर्दैवी शेवट
अग्निशमन आणि पोलीस पथकाने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले, पण परिस्थिती बिकट होती. ट्रॅक्टर बाहेर काढणे अशक्य असल्याने प्रथम विहिरीतील पाणी बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. गावकऱ्यांनीही खांद्याला खांदा लावून पाणी खेचण्याचे काम सुरू केले. तब्बल 12 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर विहिरीतील पाण्याची पातळी खाली आली. पाणी बाहेर काढल्यानंतर शेवटी विहिरीच्या तळाशी शिवराजचा मृतदेह दिसून आला. त्याला बाहेर काढण्यात आले तेव्हा उपस्थितांपैकी अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. निष्पाप चार वर्षांच्या मुलाचे अशा प्रकारे झालेले निधन हे कुटुंबासाठीच नव्हे तर पूर्ण गावासाठी मोठा धक्का ठरला. गावकऱ्यांनी या दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली असून परिसरात शोककळा पसरली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंसोबत जाण्यासाठी 'त्या' आमदाराने 50 कोटी घेतले, भाजप आमदाराने नाव सांगितलं
ADVERTISEMENT











