बार्शी : खेळपट्टी सपाट करण्यासाठी रोलर फिरवू लागले, 14 वर्षीय मुलगा खाली पडला अन्...

Barshi News : क्रिकेटच्या मैदानावरील खेळपट्टी सपाट करत असताना एक दगडी रोलर फिरवण्यात येत होता. मात्र, या रोलरखाली 14 वर्षांचा मुलगा पडला आणि चिरडल्या गेल्याने त्याचा मृत्यू झालाय.

Barshi Crime News

Barshi Crime News

मुंबई तक

30 May 2026 (अपडेटेड: 30 May 2026, 03:26 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बार्शी : खेळपट्टी सपाट करण्यासाठी रोलर फिरवू लागले,

point

14 वर्षीय खाली पडला अन्...

Barshi News : सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी येथे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये क्रिकेटचे धडे घेण्यासाठी उत्साहाने समर कॅम्पला जाणाऱ्या 14 वर्षीय मुलाचा जीव गेलाय. क्रिकेट पिच रोलिंग करणाऱ्या  जड दगडी रोलरखाली आल्याने मुलाचा चिरडून मृत्यू झालाय. ही हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी (दि.30) बार्शी शहरातील शिवशक्ती मैदानावर घडली. वीरेन योगीराज चौधरी (वय 14, रा. सुभाष नगर, बार्शी) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण बार्शी शहरात शोककळा पसरली असून क्रीडा क्षेत्रासह नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : पुणे : लग्नाच्या वाढदिवशी गावठी दारू प्यायले, दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू

जड दगडी रोलर काही अल्पवयीन मुले चालवत होती

मिळालेल्या माहितीनुसार, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवशक्ती मैदानावर गेल्या दीड महिन्यांपासून क्रिकेट समर कॅम्प सुरू होता. शनिवारी या कॅम्पचा शेवटचा दिवस होता. सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास मैदानावरील क्रिकेट खेळपट्टी सपाट करण्यासाठी वापरला जाणारा जड दगडी रोलर काही अल्पवयीन मुले चालवत होती.

हेही वाचा : महिला PSI ने आंतरजातीय विवाह केला अन् वर्षभरातच..., हादरवून टाकणारी घटना

याचवेळी खेळण्यासाठी मैदानावर आलेल्या वीरेन चौधरीचा पाय अचानक रोलरखाली अडकला. तोल जाऊन तो खाली पडताच अवजड रोलर त्याच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. या भीषण अपघातात त्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. उपस्थितांनी तातडीने त्याला उपचारासाठी डॉ.जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नेले,मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

रोलर चालविण्याचे काम अल्पवयीन मुलांकडे कसे?

या दुर्घटनेनंतर संतप्त नागरिकांनी मैदान व्यवस्थापन आणि समर कॅम्प आयोजकांच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. जड आणि धोकादायक रोलर चालविण्याचे काम अल्पवयीन मुलांकडे कसे सोपविण्यात आले.? दुर्घटना घडली तेव्हा प्रशिक्षक आणि जबाबदार अधिकारी मैदानावर उपस्थित होते का.? मैदानावर कोणतीही सुरक्षा व्यवस्था किंवा आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत्या का.? असे सवाल लोकांनी उपस्थित केले आहेत. 

नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका निष्पाप 14 वर्षीय मुलाचा जीव गेल्याने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी जोर धरू लागली आहे. समर कॅम्पच्या सांगतेच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सुभाष नगर परिसरासह संपूर्ण बार्शी शहर हळहळ व्यक्त करत आहे. वीरेनचा असा दुर्दैवी अंत झाल्याने बार्शीकरांच्या मनात वेदना आणि संताप दोन्ही भावना निर्माण झाल्या आहेत.