बीड : चिमुरडीवर अत्याचार, गावकऱ्यांच्या दबावामुळे कुटुंबाने 4 दिवस उपचारासाठी नेलं नाही, मृत्यूशी झुंज सुरुच

मुंबई तक

25 Nov 2025 (अपडेटेड: 25 Nov 2025, 09:09 AM)

Beed Crime : बीड : चिमुरडीवर अत्याचार, गावकऱ्यांच्या दबावामुळे कुटुंबाने चार दिवस उपचारासाठी नेलं नाही, मृत्यूशी झुंज सुरुच

Beed Crime

Beed Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बीडमध्ये साडेपाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

point

गावकऱ्यांच्या दबावामुळे कुटुंबाने चार दिवस उपचारासाठी नेलं नाही

point

मृत्यूशी झुंज सुरुच

Beed Crime : महाराष्ट्रात मालेगाव येथील निर्घृण अत्याचार प्रकरणामुळे संताप व्यक्त केला जात असतानाच बीड जिल्ह्यात आणखी एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. शिरुर कासार तालुक्यातील एका गावात अवघ्या साडेपाच वर्षांच्या बालिकेवर तिच्याच नात्यातील मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. सध्या पीडित मुलगी बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात जीवासाठी झुंज देत आहे.

हे वाचलं का?

ही अमानवी घटना 7 नोव्हेंबर रोजी घडल्याचे समजते. अत्याचारानंतर चिमुरडी सतत वेदनांनी व्याकुळ होत असतानाही गावात पूर्णपणे असंवेदनशीलता दिसून आली. पीडितेला तातडीची वैद्यकीय मदत मिळण्याची गरज असताना गावकऱ्यांनी सलग बैठका घेत मुलीला रुग्णालयात नेऊ दिले नाही, ही बाब अत्यंत संतापजनक ठरली आहे.

हेही वाचा : उपसरपंचाने दारात आयुष्य संपवल्यानंतर अटक झाली, पण आता नर्तिका पूजा गायकवाडला बार्शी सत्र न्यायालयाकडून जामीन

कुटुंबीयांवर गावातील प्रभावी व्यक्तींकडून मोठा दबाव आणला जात होता. भीतीपोटी पीडितेला उपचारासाठी न्यायला कुटुंबीय धजावत नव्हते. त्या काळात मुलीची प्रकृती अधिकच गंभीर होत गेली. शेवटी, परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने 13 नोव्हेंबरला मुलीच्या नात्यातील एका व्यक्तीने शिरुर कासार पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाल करून गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी पथक नियुक्त करण्यात आले आहे. घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचं आणि रोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. बालिकेची अवस्था पाहून गावातील अनेक महिलांनी प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांची टीम मुलीवर सातत्याने उपचार करत असून तिची प्रकृती स्थिर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

या प्रकरणामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातील पीडित आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या सामाजिक दबावाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एखाद्या चिमुरडीच्या जीवाशी खेळणाऱ्या गुन्ह्यापेक्षा गावकऱ्यांची भूमिका अधिक धक्कादायक ठरल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. राज्यातील नागरिक आणि सामाजिक संघटनांनी अशी निर्घृण घटना घडू नये यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. ही घटना उघड होताच, मालेगावप्रकरणानंतर निर्माण झालेला संताप पुन्हा एकदा पेट घेत आहे. बालिकेवरील अत्याचाराने संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला असून मुलीच्या प्रकृतीसाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

महिलेचं बाहेर प्रेमप्रकरण, प्रियकराने घरात घुसून तिच्यासमोर नवऱ्याचा केला खून, हादरवून टाकणारं कांड...