Beed Crime: बीड जिल्ह्यातून लग्नाच्या नावाखाली मोठी फसवणूक करण्यात आल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. 34 वर्षीय तरुणासोबत लग्न केल्यानंतर अवघ्या पाच दिवसांतच वधू 6 लाख रुपयांची रोख रक्कम आणि दागिने घेऊन घरातून फरार झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पोलिसांनी वधू आणि यात सहभागी असलेल्या आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
लग्नासाठी 4 लाख रुपयांची मागणी अन् 2 लाखांचे दागिने
जिल्ह्यातील पाटोदा तहसीलमधील गंदलवाडी गावात राहणाऱ्या संजय पवार यांनी पोलिसांकडे तक्रार करताना सांगितलं की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाडगाव येथील रहिवासी असलेल्या रूपाली बाळू दिशागंज हिच्याशी त्यांची ओळख झाली. पंढरपूरमध्ये राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांच्या माध्यमातून त्यांची रूपालीशी ओळख झाली. तक्रारीनुसार, दत्ता पंढरीनाथ पवार आणि पठान नावाच्या एका व्यक्तीच्या माध्यमातून हे नातं जुळलं. दरम्यान, जयश्री रवी शिंदे नावाच्या एका महिलेने वधूची मावशी म्हणून स्वत:ची ओळख करून दिली आणि लग्नाच्या खर्चासाठी 4 लाख रुपयांची तिने मागणी केली. दुसऱ्या मध्यस्थांच्या सांगण्यावरून 2 लाख रुपयांचे दागिने सुद्धा खरेदी करण्यात आले.
लग्नानंतर, वधू सासरी आली अन्...
10 डिसेंबर रोजी पंढपूरमध्ये नोटरी अॅग्रीमेंटच्या साहाय्याने लग्न झालं आणि त्यानंतर, नवरदेवाच्या गावात लग्नासंबंधी सर्व धार्मिक विधी करण्यात आल्या. लग्नानंतर, वधू तिच्या सासरी आली आणि तिने तिच्या पतीसोबत लग्नाची पहिली रात्र म्हणून हनीमून देखील साजरा केला. तिच्या वागण्यावरून कोणालाच कसलाही संशय आला नाही. मात्र, 15 डिसेंबरच्या रात्री या प्रकरणाला वेगळंच वळण आलं.
हे ही वाचा: पत्नीच्या चारित्र्यावर संशय, सॉफ्टवेअर इंजीनिअरचं रागाच्या भरात भयानक कृत्य! पत्नीला भररस्त्यात अडवलं अन्...
घरातील पैसे आणि दागिने घेऊन वधू फरार
वधू तिच्या सासरच्या घरातील पैसे आणि दागिने घेऊन घरातून फरार झाल्याचा आरोप आहे. त्यावेळी, संजय पवार यांनी वधू आणि मध्यस्थांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता पीडितांना त्यांच्याकडून टाळाटाळ करणारी उत्तरे मिळू लागली. पीडित कुटुंबियांच्या आरोपानुसार, वधूच्या मावशीनेच त्यांना त्याच्याविरुद्ध पोलिसात खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी सुद्धा दिली होती.
हे ही वाचा: दोन सख्ख्या बहिणी अचानक रहस्यमयरित्या गायब... 'तो' एक पुरावा अन् सगळं उघडकीस! नेमकं प्रकरण काय?
अमळनेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक भार्गव सपकाळ यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की, पीडितांच्या तक्रारीच्या आधारे आरोपी वधू, दोन मध्यस्थ, वधूची मावशी म्हणून स्वत:ची ओळख सांगणारी महिला आणि एका अज्ञात महिला एजंटविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता या गुन्ह्यातील संपूर्ण नेटवर्कचा तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT











