Dhule Crime : धुळे शहरात महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून, त्या कृत्याचा व्हिडिओ चित्रीत करत तब्बल 60 लाखांच्या आसपास रक्कम उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेने शुक्रवारी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाला ताब्यात घेतले आहे. सुकलाल रामभाऊ बोरसे (वय 53, रा. विवेकानंदनगर, देवपूर) असे आरोपीचे नाव आहे.
ADVERTISEMENT
ओळखीचा गैरफायदा घेत भयंकर कृत्य
तक्रारीनुसार, बोरसे आणि पीडित महिलेची ओळख काही काळापूर्वी झाली होती. आर्थिक अडचणींमध्ये बोरसे याने मदत केली आणि त्यातून त्यांच्या संपर्कात वाढ झाली. याच जवळीकपणाचा फायदा घेऊन 17 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास बोरसे याने महिलेला पेढ्यातून आणलेले गुंगीचे औषध दिले. औषधाचा परिणाम झाल्याने महिला बेशुद्ध पडली आणि त्या अवस्थेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याच वेळी बोरसे याने संपूर्ण घटना आपल्या मोबाईलवर रेकॉर्ड केली.
हेही वाचा : '..मी कट्टर भाजपची', पुरस्कार मिळताच मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य, आता किशोरी पेडणेकर म्हणाल्या...
व्हिडिओचा वापर करून ब्लॅकमेलिंग
अत्याचारानंतर आरोपीने व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देत पीडितेला आर्थिकदृष्ट्या त्रास देणे सुरू केले. त्याच्या धमक्या आणि दबावामुळे पीडितेला वेळोवेळी मोठी रक्कम देण्यास भाग पाडण्यात आले. या पद्धतीने आरोपीने सुमारे 59 लाख 99 हजार 400 रुपये घेऊन पीडितेची आर्थिक लूट केली. केवळ पैसेच नाही, तर धमकी कायम ठेवण्यासाठी बोरसे याने तिच्या सहीचे पाच ते सहा ब्लँक चेकही स्वतःकडे घेतले.
पोलिसांत धाव, आरोपीला तातडीची अटक
दीर्घकाळ चाललेल्या त्रासामुळे अखेर पीडित महिलेने धीर एकवटत पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी रात्रीच मुख्याध्यापक सुकलाल बोरसे याच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्याला बेड्या ठोकल्या. पुढील तपास पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेने धुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, एका जबाबदार पदावरील व्यक्तीकडून असा अमानवीक कृत्य केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











