इसरार चिस्ती, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर परिसरातील 93 वर्षीय आजोबा आणि त्यांची पत्नी यांच्या ज्वेलर्सच्या दुकानातील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. ज्यामध्ये ज्वेलर्स दुकान मालकाने आजी-आजोबांशी आपुलकीने गप्पा तर मारल्याच पण त्यासोबतच त्यांना सोन्याचे काही दागिने देखील देऊ केले. अवघे 20 रुपये घेऊन मालकाने या वृद्ध दाम्पत्याला दागिने दिले. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला असून सध्या ज्वेलर्स मालकाचं प्रचंड कौतुक होत आहे. दरम्यान, ज्या आजी-आजोबांचं व्हिडिओ व्हायरल झाला त्यांना गाठून मुंबई Tak त्यांच्या भावना काय ते जाणून घेतलं.
ADVERTISEMENT
'त्या' आजी-आजोबांची मुंबई Tak सोबत एक्स्क्लुझिव्ह गप्पा
दरम्यान, सोनाराच्या दुकानातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या आजी-आजोबांनी त्यांची नेमकी कहाणी मुंबई Tak सोबत बोलताना सांगितली. पाहा ते नेमकं काय म्हणाले.
आजोबा: सोनाराला द्यायचे पैसे आम्ही महिनाभर गोळा करत होतो. 1-1 रुपया आम्ही गोळा केला. 1100 रुपये जमा केले होते. 15-16 वर्षांपासून मला तिला (बायकोला) पोत घ्यायची होती पण आमच्याकडे खायला देखील पैसे नव्हते.
जालनाच्या इकडे आमचं मूळ गाव आहे. पण आता इकडे आम्ही मागून उदरनिर्वाह करतो आमचा..
माझा एक मुलगा वारला आणि एक आहे. तो शेतीचं काम करतो, पण त्याला दारूचं व्यसन आहे.
आजी: आम्ही सोन्याची 4 दुकानं फिरलो, नंतर 5 व्या दुकानात आम्हाला हे मिळालं. बारीक बारीक पोत होत्या तर त्या पसंत नव्हत्या मला. याच्याकडे बरे मणी होते म्हणून ते 2500 हजाराला पोत घेतली. त्याला पैसे देऊ लागले तर ते पैसे त्याने घेतले नाही. त्याने माझ्याकडून फक्त 20 रुपये घेतले. आमच्याकडे 2500 रुपये होते. ते आम्ही त्याला देतो होतो..
लग्नाच्या वेळी काही दागिने दिले नव्हते. तेव्हा काही नव्हतंच यांच्याकडे. पण आता मी खूप खूश आहे. मला आता काहीच कळत नाही. आम्ही गजानन मंदिरात राहतो. तिथे कोणी पैसे देतो तर कोणी जेवायला देतो.
आजोबा: माझ्यावर 86 हजार कर्ज होतं.. पण ते कर्ज आम्ही फेडलं. मंदिराबाहेर लोकांकडून जे पैसे मिळायचे त्या पैशातूनच आम्ही कर्ज फेडलं. आम्हाला सरकारकडून गावी घर मिळावं ही सरकारकडून अपेक्षा आहे.
ADVERTISEMENT
