Goa arpora nightclub fire 23 killed cylinder blast marathi news : गोव्यातील Arpora गावातील Birch by Romeo Lane या लोकप्रिय शनिवारी रात्री भीषण आग लागली होती. या आगीत किमान 23 जणांचा मृत्यू झालाय, तर 50 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मृतांपैकी बहुसंख्य जण हे क्लबमध्ये काम करणारे कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पर्यटन हंगामाच्या मध्यावर राज्यात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
गोव्याचे पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, क्लबच्या आत झालेल्या सिलिंडर स्फोटामुळे ही आग भडकली. मागील वर्षी सुरू झालेल्या या नाइटक्लबचे ठिकाण पणजीपासून जवळपास 25 किलोमीटर अंतरावर आहे. “23 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बहुतांश मृत कर्मचारी वर्गातील आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली. मृतांमध्ये तीन महिलांचादेखील समावेश असल्याची पुष्टी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली.
मुख्यमंत्री सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, तीन जणांचा मृत्यू गंभीर भाजल्यामुळे झाला असून उर्वरित लोकांचा मृत्यू गुदमरल्याने झाला असावा. प्राथमिक तपासात या नाइटक्लबने अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले नसल्याचे दिसून येत असल्याची माहिती त्यांनी दिली. “क्लब व्यवस्थापनाविरोधात कठोर कारवाई केली जाईल. तसेच सुरक्षेचे नियम मोडून परवानगी दिलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार आहे,” असा इशारा त्यांनी दिला.
पूर्वी आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पर्यटकांना काहीही इजा झाली नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र नंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, मृतांमध्ये “3 ते 4 पर्यटकांचाही समावेश” आहे.
स्थानिक आमदार मायकेल लोबो यांनी सांगितले की, सर्व मृतदेह बांबोळीममधील गोवा मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवण्यात आले असून अग्निशामक दल आणि पोलिसांनी रात्रीभर बचावकार्य केले. लोबो यांनी याप्रकरणी परिसरातील सर्व नाईटक्लब चालकांना सोमवारपासूनच वैध अग्निसुरक्षा परवानग्या सादर करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचे सांगितले. नियमांचे पालन न करणाऱ्या स्थळांचे परवाने रद्द करण्याची तयारी प्रशासनाने दर्शवली आहे. या भीषण आगीप्रकरणी सविस्तर चौकशीचे आदेश देण्यात आले असून लवकरच परिसरातील सर्व नाइटक्लबचा अग्निसुरक्षा ऑडिट सुरू होणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रति मृत ₹2 लाख आणि जखमींना ₹50 हजार इतकी मदत प्रधानमंत्री राष्ट्रीय राहत निधीतून देण्याची घोषणा केली. “ही घटना अतिशय वेदनादायक आहे. जखमींची प्रकृती लवकर सुधारो, अशी प्रार्थना करतो,” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. या भीषण दुर्घटनेने गोवा राज्यात सुरक्षेच्या नियमांबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले असून चौकशी अहवालानंतर जबाबदारांवर कठोर कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











