पाच दशके मराठ्यांच्या इतिहासाची सेवा करणारे डॉ. जयसिंगराव पवार काळाच्या पडद्याआड

Historian DR Jaysingrao Pawar Passed Away : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन झाले. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Historian DR Jaysingrao Pawar Passed Away

Historian DR Jaysingrao Pawar Passed Away

मुंबई तक

26 Mar 2026 (अपडेटेड: 26 Mar 2026, 09:23 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पाच दशके मराठ्यांच्या इतिहासाची सेवा करणारे डॉ. जयसिंगराव पवार काळाच्या पडद्याआड

point

जयसिंगराव पवार यांचं वयाच्या 85 व्या वर्षी निधन

Historian DR Jaysingrao Pawar Passed Away : महाराष्ट्राच्या इतिहास लेखन परंपरेतील देदीप्यमान तारा निखळला असून, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज (दि.26) पहाटे कोल्हापूर येथे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. निमोनियासदृश आजारामुळे त्यांची प्रकृती खालावली होती आणि आज उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने शिवकाल आणि मराठा कालखंडाचा सखोल अभ्यास करणारा एक दिग्गज इतिहास संशोधक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

हे वाचलं का?

डॉ. जयसिंगराव पवार यांनी आपले संपूर्ण आयुष्य इतिहास संशोधनासाठी अर्पण केले होते. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर त्यांनी केलेले संशोधन आणि लेखन अत्यंत मोलाचे मानले जाते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून, राज्याच्या इतिहास संशोधनातील एका गौरवशाली अध्यायाचा आज अंत झाला आहे.

हेही वाचा : अजितदादांच्या विमान अपघाताबाबत देवेंद्र फडणवीस यांनी दिली 57 दिवसानंतर महत्त्वाची अपडेट, पायलटबाबत म्हणाले...

इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी व्यक्त केल्या भावना 

महाराष्ट्र इतिहासाचा आधारवड हरपला!

"इतिहास हा राष्ट्राचा आणि समाजाचा प्रबोधक असतो" हे ब्रीदवाक्य घेऊन गेली तब्बल पाच दशके मराठ्यांच्या इतिहासाची सेवा करणारे डाँ. जयसिंगराव पवार यांचे आज निधन झाले. गेली सलग पन्नास वर्ष पवार सरांचे महाराष्ट्र इतिहास लेखणाचे कार्य सूरू होते. छत्रपती संभाजी महाराज स्मारक ग्रंथाच्या दर्जेदार कामापासून ते महाराणी ताराबाई साहेब, शिवपुत्र राजाराम महाराज, सेनापती संताजी घोरपडे अशा मराठ्यांच्या इतिहासातील महान पराक्रमी पण इतिसकारांनी दखल न घेतलेल्या अनेक चरित्रांवर पवार सरांनी आपल्या संशोधकिय लेखणीतून प्रकाश टाकला. एक प्रकारे ही विस्मरणात गेलेली चरित्रे नव्याने उजेडात आणली.

 राजर्षी शाहू स्मारक ग्रंथाचे लेखन संपादन हे इतिहास मांडणीचा मानदंड ठरावा. शाहू महाराजांचे जीवन व कार्य लोकांपर्यंत पोहोचवणे हे पवार सरांनी आपले लाईफ मिशन मानले होते. शाहू महाराजांच्या जीवनावरील फक्त ग्रंथाची निर्मिती केली नाही तर हा ग्रंथ भारतातील आणि विदेशातील अनेक भाषांमध्ये प्रकाशित करून शाहू चरित्र सर्वदूर पोहोचावे म्हणून प्रयत्न केलेले पवार सर हे पहिली व्यक्ती ही आहेत.

 महाराष्ट्र इतिहासाची अशी सेवा करत असतानाच सरांनी राजर्षी शाहू स्मारक भावन सारख्या एका महत्त्वाच्या सांस्कृतिक केंद्राच्या संचालक पदापासून ते शिवाजी विद्यापीठातील शाहू संशोधन केंद्राच्या संचालक पदापर्यंतची धुरा गेली अनेक वर्ष आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलली होती. 

 सरांनी माझ्यासारख्या अनेकांना इतिहासा चा अभ्यास करून इच्छिणाऱ्या तरुणांना, व्यक्तींना मार्गदर्शन करून इतिहास लेखन कसे करावे, इतिहास संशोधनाच्या पायऱ्या कशा चढाव्यात याचे योग्य मार्गदर्शन केले होते. पवार सर हे मराठ्यांचा सत्य इतिहास मांडू इच्छिणाऱ्या अनेक अभ्यासकांचे आधारवड होते. सतत कार्यरत राहून मराठाबहुजनांचा सत्य इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून पवार सरांनी घेतलेला ध्यास हा त्यांना लोका़च्या मनातील "महाराष्ट्रभूषण"ठरवतो. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अजितदादांच्या विमान अपघाताबाबत देवेंद्र फडणवीस यांनी दिली 57 दिवसानंतर महत्त्वाची अपडेट, पायलटबाबत म्हणाले...