Jalna Crime News : जालन्यातील अंबड तालुक्यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रीती भाकड असे या मृत तरुणीचे नाव असून ती दहीगव्हाण खुर्द येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील होती. पोलीस दलात भरती होऊन आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे स्वप्न उराशी बाळगून प्रीती अंबड येथील एका खासगी पोलीस भरती प्रशिक्षण अकादमीमध्ये सराव करत होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, प्रशिक्षण केंद्राच्या बेजबाबदारपणामुळे एका निष्पाप तरुणीला जीव गमवावा लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
ADVERTISEMENT
भरती प्रक्रियेमध्ये पोहण्याची अट नसतानाही सराव
मिळालेल्या माहितीनुसार, प्रीती नेहमीप्रमाणे गुरुवारी पहाटे अकादमीच्या इतर विद्यार्थ्यांसोबत शारीरिक सरावासाठी अंबड शहराच्या जवळील वलखेडा शिवार येथील खदान परिसरात गेली होती. पोलीस भरती प्रक्रियेमध्ये पोहण्याची कोणतीही अट किंवा अनिवार्य सराव नसतानाही, अकादमीचे संचालक गोकुळ बारवाल आणि ट्रेनर गणेश भागवत वायसे यांनी प्रीतीला खदाणीच्या खोल पाण्यात उतरण्यास भाग पाडले. प्रीतीला पोहता येत नाही, ही बाब प्रशिक्षण देणाऱ्यांना माहिती असतानाही तिला पाण्यात उतरण्यास सांगणे, हा मोठा निष्काळजीपणा असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे. पाण्यात उतरल्यानंतर खोलीचा अंदाज न आल्याने प्रीती बुडू लागली, तिला वाचवण्याचा सहकाऱ्यांनी प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना यश आले नाही.
हेही वाचा : 'तू उशीरा का आलीस?' हात-पाय बांधले अन् गरम इस्त्रीने...; पोलिसानं हे काय केलं?
संचालकाविरोधात गुन्हा दाखल
घटना घडल्यानंतर प्रीतीला तात्काळ अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. प्रीतीचे वडील अंशीराम एकनाथ भाकड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, अंबड पोलीस ठाण्यात अकादमीचे संचालक गोकुळ बारवाल आणि ट्रेनर गणेश भागवत वायसे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 105 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.
एका गरीब शेतकरी कुटुंबातील मुलीचे खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न अशा प्रकारे अर्धवट राहिल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. केवळ भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या हट्टापायी किंवा चुकीच्या मार्गदर्शनामुळे एखाद्या विद्यार्थ्याचा जीव जातो, हे अत्यंत गंभीर असून अशा खाजगी अकॅडमींच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रीतीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे. या घटनेने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT











