Jalna News : जालन्यात महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना एका कंत्राटदाराकडून 10 लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल रंगेहात पकडलं. या कारवाईनंतर शहरातील कंत्राटदारांनी एसीबी कार्यालयासमोर फटाके फोडत जल्लोष केलाय. आयुक्त खांडेकर हे कंत्राटदारांचं कोणतंही काम पैशांशिवाय करत नाही, असा आरोप वारंवार होत होता. अखेर काल एसीबीच्या पथकाने खांडेकर यांना 10 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर एसीबीच्या या कारवाईचं कंत्राटदारांनी स्वागत करत एसीबी कार्यालया बाहेर फटाके फोडून कंत्राटदारांनी जल्लोष साजरा केलाय.
ADVERTISEMENT
एसीबीच्या माहितीनुसार, आयुक्त खांडेकर यांनी ही लाच स्वीकारताच तक्रारदाराने ठरल्याप्रमाणे पथकाला मिसकॉल दिला. तत्काळ कारवाई करत एसीबीच्या अधिकाऱ्यांनी खांडेकर यांना पकडले. रात्री सुमारे 7.30 च्या सुमारास ही कारवाई पार पडली. जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष महादेव खांडेकर यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने गुरुवारी सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी रंगेहात अटक केली. कंत्राटदारांकडून चार कामांच्या बिलांसाठी एकूण 10 लाख रुपयांची मागणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
दरम्यान, या कारवाईची बातमी पसरताच जालना येथील काही कंत्राटदारांनी एसीबी कार्यालयासमोर फटाके फोडून कारवाईचे स्वागत केले. त्यांनी आयुक्तांविरोधात आपला रोष व्यक्त करत एसीबीचे आभार मानले. कंत्राटदारांचा आरोप आहे की, खांडेकर यांनी बांधकाम कामांचे बिल मंजूर करण्यासाठी दहा लाख रुपयांची लाच मागितली होती, ज्यामुळे त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली.
आश्चर्याची बाब म्हणजे, अलीकडेच आयुक्त संतोष खांडेकर यांनी स्वतःच लाचखोरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुनावले होते. काही कर्मचारी अतिक्रमण प्रकरणांमध्ये पैसे घेऊन व्यवहार करत असल्याच्या तक्रारी त्यांच्या पर्यंत पोहोचल्या होत्या. या तक्रारींवर त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना केबिनमध्ये बोलावून फटकारले होते. परंतु केवळ दोन दिवसांनीच स्वतः खांडेकर लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकले, हे पाहून सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. ‘दुनिया सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण’ असाच प्रकार इथे घडल्याची चर्चा जालन्यात रंगली आहे.
संतोष खांडेकर हे मूळचे सांगोला (जिल्हा सोलापूर) येथील असून, त्यांनी MPSC द्वारे क्लास-2 अधिकारी म्हणून शासकीय सेवेत प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी सहा वर्षे यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम पाहिले. त्यानंतर 2022 मध्ये त्यांची जालना नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली. पुढे 9 मे 2023 रोजी जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले आणि खांडेकर यांची शहराचे पहिले आयुक्त म्हणून निवड झाली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
बबन शिंदे,राजन पाटलांसह आणखी 2 माजी आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा, सोलापुरात मोठ्या घडामोडी
ADVERTISEMENT
