Kolhapur Crime News : कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी परिसरात वैयक्तिक वादातून एका तरुणाने हॉटेलमध्ये घुसून प्रचंड तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. रिलायन्स मॉलसमोरील लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर येथील ‘स्वस्तिक’ हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी अरबाज मोमीन या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, अरबाज मोमीन हा कोल्हापुरातील घिसाड गल्ली परिसरात कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्याची आई लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर येथील स्वस्तिक हॉटेलमध्ये मजुरीचे काम करते. हॉटेलचे मालक मुनिर मलबारी आणि अरबाज मोमीन यांच्या आईमध्ये काही कारणावरून वाद झाला होता. या वादातून निर्माण झालेल्या रागातून अरबाज मोमीन याने संतापाच्या भरात हॉटेलमध्ये धुडगूस घातल्याची माहिती आहे.
हेही वाचा : 2 मुलांच्या आईवर तरुणाचं एकतर्फी प्रेम... शेवटी, वैतागलेल्या महिलेने आई-वडिलांसोबत मिळून काढला काटा!
आज दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास अरबाज मोमीन हा स्वस्तिक हॉटेलमध्ये गेला. त्याने हॉटेल मालक मुनिर मलबारी यांना बेदम मारहाण केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर त्याने हॉटेलमधील काऊंटर आणि टेबल उलथवून टाकत मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. हॉटेलमधील वस्तूंची नासधूस करण्यात आली. तसेच हॉटेलचा बोर्ड आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर दगडफेक करून ते फोडण्यात आले. एवढेच नव्हे तर हॉटेलच्या दारातील फरशादेखील फोडण्यात आल्या. सीसीटीव्ही कॅमेरे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकून दिल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सुमारे अर्धा तास हा प्रकार सुरू होता. या काळात फोर्ड कॉर्नर ते उमा टॉकीज या मार्गावरून ये-जा करणारे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी हा सारा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहिला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रस्त्यावर मोठी गर्दी जमली आणि काही काळ वाहतूक कोंडीही झाली.
घटनेची माहिती लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील गोपनीय हवालदार एकनाथ कळंत्रे यांना मिळताच पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हवालदार वृंदा इनामदार, सुहास पाटील, मंगेश माने, सुरज पाटील, प्रतिक शिंदे आणि प्रियंका जामदार यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच अरबाज मोमीन याला ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर भर रस्त्यात चोप दिल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. सध्या लक्ष्मीपुरी पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे. वैयक्तिक वादातून घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











