मुंबई : राज्यातील रस्ते सुरक्षेची स्थिती पुन्हा चिंताजनक बनली असून, जानेवारी ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अपघात आणि मृत्यूंच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. परिवहन विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, या नऊ महिन्यांत राज्यात तब्बल 10 हजार 720 अपघात घडले. या भीषण घटनांमध्ये 11 हजार 532 नागरिकांचा बळी गेला.
ADVERTISEMENT
राज्यातील अपघातांमध्ये सर्वाधिक घटना मुंबईत नोंदविण्यात आल्या आहेत. दैनंदिन वाहतुकीचा ताण, वाढती वाहनसंख्या आणि रस्त्यांवरील वाढलेले दाब यामुळे 2025 मधील अपघातांचे प्रमाण 2024 च्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून आले. मुंबईत याच कालावधीत तब्बल 1,878 अपघात झाले असून, त्यात 262 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, राज्यातील सर्वाधिक मृत्यू पुणे ग्रामीण भागात झाले आहेत. ग्रामीण पट्ट्यातील रस्त्यांची धोकादायक स्थिती, वेगमर्यादांचे उल्लंघन आणि अव्यवस्थित वाहतूक यामुळे एकूण 764 जणांचा जीव गेला आहे. त्यामुळे ग्रामीण रस्त्यांवरील सुरक्षाव्यवस्थेची उणीव पुन्हा अधोरेखित झाली आहे.
मुंबई–पुणे महामार्गावर अपघातांचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी महामार्गावर कॅमेरे आणि इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमची उभारणी करण्यात आली. वेग नियंत्रक उपाययोजना आणि तात्काळ कारवाईमुळे या महामार्गावरील अपघातात काही प्रमाणात घट झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, याच्या उलट परिस्थिती समृद्धी महामार्गावर दिसून येते. या महत्त्वाच्या द्रुतगती मार्गावर कोणतीही स्मार्ट सुरक्षा यंत्रणा कार्यरत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. वाहनांची संख्या वाढत असताना आवश्यक सुरक्षायंत्रणा सुरू न राहिल्याने परिस्थिती अधिकच बिकट होत चालल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत काय बदल?
जानेवारी ते सप्टेंबर 2024 कालावधीच्या तुलनेत 2025 मध्ये समृद्धी महामार्गावरील मृत्यूंच्या संख्येत तब्बल 16 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीमुळे महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे, मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवर मृत्यूंच्या प्रमाणात 29 टक्क्यांची घट झाली असून, तिथे राबविलेल्या उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम झाल्याचे स्पष्ट होते.
राज्यातील या आकडेवारीतून रस्ते सुरक्षेची स्थिती किती गंभीर आहे, हे पुन्हा ठळकपणे समोर आले आहे. वाढती वाहने, अपुऱ्या सुरक्षा उपाययोजना आणि नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यांवरील जीवितहानीचे प्रमाण नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यामुळे शासन, वाहतूक विभाग आणि रस्त्यांचा वापर करणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
नगरपंचायत बिनविरोध करण्यासाठी अनगरमध्ये दहशत? अर्ज भरु नये म्हणून पाठलाग; महिलेचे भाजप नेत्यावर आरोप
ADVERTISEMENT











